
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत सातत्याने कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात दरडीचा काही भाग कोसळला. या दरडीसोबत चार घरे तब्बल 50 फूट खाली कोसळली तर बुधवारी सकाळीदेखील माती खचल्याने दोन घरे मातीबरोबर खाली आली. सुदैवाने, आधीच ही घरे रिकामी करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात ओमेगा हायस्पूलच्या समोर असलेल्या साई निकेतन गृहनिर्माण संस्थेत मंगळवारी सायंकाळी पावसामुळे जमीन भुसभुशीत होऊन संरक्षक भिंतीसह चार घरे खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले तर बुधवारीदेखील माती खचल्याने दोन घरे मातीसोबत खाली आली, मात्र आधीच घरे रिकामी केल्यामुळे मोठा धोका टळला. पावसाळय़ापूर्वीच पालिकेने दरडप्रवण भागातील नागरिकांना नोटिसीद्वारे सतर्प केले होते.