साहित्य जगत- भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना…

>> रविप्रकाश कुलकर्णी

खरे तर आपला सचिन असे म्हणायची सवय झाली आहे. त्यामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना म्हणताना जरा अडखळायला झालं, पण ते असो. प्रेमाची रीतच न्यारी…

आता सचिनबद्दल काही सांगायचं राहिलंय का? हो काही सांगायला हवं. त्याला कारणही तसंच झालंय.

वास्तूरहस्य प्रकाशनतर्फे ‘विठ्ठल वारी आनंद यात्रा’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित झालेले आहे. मनात आलं आता वारीवर आणि अगदी परत वारीवरदेखील लिखाण झालेलं आहे. तेव्हा बबनराव पाटील आता काय गोळा करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली, पण असल्या पुस्तकाला वेळापत्रक नसतं. कारण अशा पुस्तकात अनेकांचे हात लागलेले असतात, लागत असतात. त्या सगळ्यांना सांभाळत पुस्तक काढणे आणि तेदेखील उत्कृष्ट निर्मिती मूल्य असणारे, ही एक परीक्षाच असते, पण अखेरीस एकदाचे ‘विठ्ठल वारी आनंद यात्रा’ हे कॉफी टेबल बुक डोंबिवलीत प्रकाशित झाले. उत्कृष्ट फोटोचित्र असणारे हे कॉफी टेबलबुक. त्याच्या जोडीला वारी संबंधात लहान-मोठे, नवे-जुने लेख आहेत. वारी करणाऱयांचे आहेत आणि वारी न केलेल्यांचे पण आहेत. पुस्तक पाहताना तुम्ही त्यात नक्की गुंतत जाल.

ही पंढरपूरची भूल काय आहे याची गोष्ट सुलभा कोरे यांनी आपल्या संपादकीयमध्ये सांगितली आहे.

एकदा एक वारकरी खांद्यावर वारीची पताका घेऊन भर उन्हातून पंढरपूरच्या वाटेने चालला होता. त्याला असं एकटाच चालत जाताना पाहून आपल्या बीएमडब्ल्यू गाडीतून प्रवास करणाऱया एका श्रीमंत माणसाने त्याच्या जवळ आपली गाडी थांबवून त्याची चौकशी केली आणि “मी त्याच वाटेने जातोय, तुम्हाला सोडतो’’ म्हणून त्याने त्या वारकऱयाला गाडीत घेतलं. बोलता बोलता त्या माणसाने वारकऱयाला विचारलं, “विठ्ठल तर प्रत्येक माणसात, चराचरात आहे, कणाकणात आहे. मग तुम्हाला पंढरपूरला जायची गरजच काय? देव तुम्हाला तुमच्या घरात, आजूबाजूला कुठेही भेटेल.’’ त्याच्या या वक्तव्यावर वारकरी फक्त  हसला.

इतक्यात गाडीवाल्याच्या लक्षात आले की, गाडीच्या चाकातील हवा कमी आहे आणि हवा भरल्याशिवाय गाडी व्यवस्थित चालणार नाही. म्हणून त्याने एका पेट्रोल पंपापाशी गाडी थांबवली आणि टायरमध्ये व्यवस्थित हवा भरून घेतली. पंढरपूरच्या रस्त्यावर वारकऱयाने गाडीवाल्याला प्रश्न केला, “साहेब, एक प्रश्न विचारू? हवा तर सर्वत्र आहे. मग तुम्ही तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरून घेण्यासाठी हवा भरण्याच्या स्टेशनवर का थांबला?’’ गाडीवाला म्हणाला, “अहो, हवा सर्वत्र असली तरी टायरमध्ये ती एका वेगळ्या प्रेशरने भरावी लागते आणि ते काम हा हवेचा प्रेशर पॉइंटच करतो.’’

गाडीवाल्याच्या या उत्तरावर वारकरी पुन्हा हसला आणि म्हणाला, “पंढरपूर आमच्या हवेचा प्रेशर पॉइंट आहे.’’ गाडीवाला अवाक्…

तर रघुनाथ माशेलकरांनी मुलाखतीत म्हटलंय, “श्रद्धा आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विश्वास कुठल्या शक्तीमुळे येतो हे सांगता येत नाही. काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात आणि विज्ञानालाही नम्रता असली पाहिजे. वारीच्या बाबतीतही मी तेच म्हणेन.’’ तर असं वेगवेगळे पण या पुस्तकात आहे. कोणी म्हणेल मग यात सचिन तेंडुलकर कसे येतात? तेच सांगायचे आहे.

या पुस्तकाला वेगवेगळ्या लोकांच्या शुभेच्छा आहेत. त्यात चक्क सचिन तेंडुलकर यांच्यादेखील आहेत! त्यात त्यांनी म्हटलं आहे, “संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून सुमारे सातशेहून अधिक वर्षे अखंडपणे चालत आलेली ही वारी दरवर्षी न चुकता आषाढी एकादशीला होत असते. जी अवघ्या जगाला स्तिमित करते. ही खरोखरच एक रहस्यमयी कुतूहलाची बाब आहे आणि हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न श्री. बबनराव पाटील यांनी केला आहे. खूप परिश्रम घेऊन, माहिती एकत्र करून या वारीविषयी त्यांनी ‘विठ्ठल वारी आनंद यात्रा’ या कॉफी टेबल पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक तज्ञ, अभ्यासक, आध्यात्मिक गुरू यांचे माहितीपूर्ण लेख, मुलाखती, कीर्तने, अभंग, छायाचित्रे यांचा समावेश केलेला आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा पुस्तकात योग्य वापर करत दृकश्राव्य माध्यमाचा पर्याय वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.’’

एकूण सचिनने पुस्तकाचे नेमके मर्म उलगडून दाखवले आहे.  आता कोणी म्हणेल हे सांगण्यासाठी का टिपण केले आहे? तर नाही!

सचिन तेंडुलकर यांच्या पत्रावरती पत्ता दिलाय – 19, पेरी क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई 400050. भारत. [email protected]

पेरी रोडचं नाव बदलून आता मास्टर विनायक मार्ग असं झालेलं आहे. हे सचिन तेंडुलकर यांना माहीत नाही काय? म्हणजे त्यांच्या पत्त्यावर 19, ए, मास्टर विनायक छेद मार्ग असा हवा. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा पत्ता अचूकच हवा ना?