
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सहभाग असलेल्या एकालाही सोडणार नाही, असे वचन त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आज दिले.
महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील परिसरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यात वाल्मीक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप आहे. 21 महिने उलटूनही त्याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन न्यायासाठी आपण केलेली धडपड मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली तेव्हा ते भावनाशील झाले, असे त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात कुणाचाही सहभाग असो, एकालाही सोडणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बीडच्या पोलीस अधीक्षकांना पह्न लावला आणि याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले, असे त्या म्हणाल्या.
कराडच्या दबावामुळे पोलिसांनी तपास थांबवला
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावरून वाल्मीक कराडने पोलिसांना पह्न करून महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास थांबवला होता असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांची नावेही मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून या प्रकरणाचा तपास केला जात असला तरी आजही आरोपी मोकाट फिरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.