तिरुपती मंदिरात ‘REELS’ वर बंदी, मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

देशातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड लागू केल्यानंतर आता व्हिडीओ आणि फोटोग्राफीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जात आहे. मंदिरांची सुरक्षा आणि शिस्तबद्धतेसाठी मंदिर प्रशासन दिवसेंदिवस कठोर निर्णय घेत आहे. दरम्यान जुलै महिन्यात शबरीमाला मंदिरात व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी बंदी घातल्यानंतर आता आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिर परिसरात सोशल मीडियावरील रील व्हिडीओ बनवण्यावर बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लघन केले तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा कठोर इशारा मंदिर प्रशासनाने दिला आहे.

याआधी देशातील अनेक मंदिरांनी रिल्सवर बंदी आणली होती. यामध्ये प्रामुख्याने केदारनाथचा समावेश आहे. केदारनाथ येथे रिल्स करणाऱ्यांची संख्या लाखोंनी वाढल्यामुळे, केदारनाथ मंदिर प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला होता. आता त्यापाठोपाठ तिरुपती देवस्थाननेही व्हिडीओ शूट करण्यावर बंदी आणण्याचे परिपत्रक जारी केले आहे.

मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेले काही लोक तिरुमला मंदिरासमोर खोडसाळ कृत्यांचे व्हिडिओ (रील) बनवत आहेत. आणि ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. तिरुमलासारख्या पवित्र आध्यात्मिक ठिकाणी असे आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्य करणे चुकीचे आहे. अशा कृत्यांमुळे केवळ भाविकांच्या भावना दुखावल्या जात नाहीत तर आध्यात्मिक वातावरणही बिघडत आहे. त्यामुळे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे.

तिरुमला हे पूजा आणि भक्तीसाठी समर्पित एक पवित्र स्थान आहे. मंदिर म्हणजे कोणतेही टूरिस्ट स्पॉट नाही. त्यामुळे देवाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाने मंदिराचे पावित्र्य जपलेच पाहिजे. तसेच सर्व भाविकांनी मांदिराचे आणि तेथील परिसराचे आध्यात्मिक महत्त्व आदराने पाळावे अशी अपेक्षा आहे. जर मंदिराच्या नियमांचे कोणी उल्लघन केले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे तिरुपती तिरुमाला देवस्थानच्या निवेदनात म्हटले आहे.