
निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतं चोरली आणि याचे आपल्याकडे ठोस पुरावे आहेत असा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच यात निवडणुक आयोगाचे जे जे अधिकारी आहेत त्यांना सोडणार नाही असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतं चोरली आहेत याचे ठोस पुरावे आम्हाला मिळाले आहेत. हे मी गांभीर्याने बोलतोय, माझ्याकडे याचे 100 टक्के पुरावे आहेत. जर आम्ही हे पुरावे बाहेर आणले तर सगळ्यांना कळेल की निवडणूक आयोग मतं चोरत आहेत. निवडणूक आयोगाने भाजपसाठी ही मतं चोरली आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला संशय होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमचा संशय आणखी बळावला. महाराष्ट्रात एक कोटी मतदार वाढले होते. यात आम्ही सखोल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने याबाबतीत आम्हाला काहीच सहकार्य केले नाही. तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने तपास केला. सहा महिन्यात आम्ही पुरावे गोळा केला. हे पुरावे म्हणजे अॅटम बॉम्ब आहे. हा बॉम्ब जेव्हा फुटेल तेव्हा देशात निवडणूक आयोग दिसणारच नाही. जे लोक ही मतं चोरत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. उद्या हे लोक निवृत्त होतील तरी त्यांना आम्ही सोडणार नाही. कारण तुम्ही देशाविरोधात काम करत आहात असेही राहुल गांधी म्हणाले.