दखल – आशयगर्भ कवितांचे संचित

>> अस्मिता येंडे

गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करणारे सर्जनशील, समाजभान जपणारे आदर्श शिक्षक विजयकुमार देसले ऊर्फ विजयराज हे लेखक, कवीसुद्धा आहेत. त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्या व्यक्त होण्याची ऊर्मी ते आपल्या नवीन कवितासंग्रहाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवू पाहत आहेत.

कवी विजयराज यांचा ‘गंध फुलांचा’ हा कवितासंग्रह गोठलेल्या जाणिवांना नवसंजीवनी देणारा आहे. या कवितासंग्रहात 85 कवितांचा समावेश असून यमक, मुक्तछंदात रचलेल्या कविता मानवाचा जीवनप्रवास क्रमवार रेखाटतात. जीवनाच्या अविभाज्य घटकांचा, नात्यांचा आलेख मांडणारा हा कवितासंग्रह आहे. देवधर्म, नातीगोती, बालपण,  शिक्षक, मैत्री, प्रेम, विरह, दुःख, निसर्ग, स्त्रित्वाची रूपे, मानसिक समाधान, जगण्याची परिभाषा, भाषाभिमान, सण-उत्सवाचे महत्त्व, त्यामागील शास्त्र, माणूस म्हणून असणारी कर्तव्ये, नैतिक मूल्यांची जपणूक अशा विविध विषयांवर सहजपणे भाष्य करणाऱया या कविता आहेत. कवितेत कुठेही बडेजाव नाही, आलंकारिक शब्दांचा भडिमार नाही, आहे तो निर्मळ भाव, प्रवाही आणि प्रभावी शब्दांगण.

कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करताना गणरायाची आराधना केली जाते. या कवितासंग्रहाच्या सुरुवातीला गणरायाचे स्मरण केलेले आहे.

आठवतंय मला, पहिला शब्द, पहिला गुरुमंत्र

तिनेच मला शिकवला, तिच्याच सहयोगाने अक्षरधडा गिरवला

आपल्या आयुष्यातील पहिली गुरू म्हणजे आई. ‘तिच्याएवढी उतराई’, ‘प्रणाम त्या हातांना’, ‘काळ बदलला’, ‘मर्म’, ‘झुंज जगण्याशी’, ‘जगायचेच राहून गेले’ या कविताही प्रभावी आहेत. कवी समाजाप्रति जितका कटिबद्ध आहे, तितकाचा निसर्गाप्रतिही आहे, हे त्यांच्या निसर्गकवितांवरून जाणवते.

गंध फुलांचा

कवीविजयकुमार देसले ऊर्फ विजयराज

प्रकाशक ः रंगतदार प्रकाशन

मूल्य ः 250 रुपये