परीक्षण – विश्व साहित्याचा मागोवा

>> निलय वैद्य

लेखक राजीव श्रीखंडे मोठे उद्योजक आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते कायम परदेश दौऱयावर असतात. आठ-दहा तास विमान प्रवास हा त्यांचा बहुत करून दिनक्रम असतो. श्रीखंडेंनी ही अडचण संधीत परावर्तित केली अन् त्यांना पुस्तकांचा लळा लागला. त्यात जागतिक साहित्याचा समावेश झाला. आजही हा अनोखा प्रवास सुरू आहे. याचं पुढचं पाऊल म्हणजे जागतिक पुस्तकांच्या नोंदी काढणं. नंतर या प्रसिद्ध पुस्तकांवर त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यावर यूटय़ूब चॅनलही सुरू केले. राजीव श्रीखंडे लिखित ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व!’ या पुस्तकाचा जन्म झाला.

लेखक राजीव श्रीखंडे यांनी ‘अक्षरविश्व’ या पुस्तकात 1532 ते 2001 म्हणजे सुमारे 470 वर्षांत प्रकाशित झालेल्या एकूण साहित्यकृतींचा त्यांच्या लेखकांसह मागोवा घेतला आहे. निकोलो मॅकव्हेलीचं ‘द प्रिन्स’, डॅनियल डेकोचं ‘रॉबिन्सन व्रुसो’, जोनाथन स्विफ्टचं ‘गलिव्हर्स ट्रव्हल’, व्हाल्टेअरचं ‘कॉनंदिद’  ब्रॅम स्टोकरचं ‘ड्रक्युला’ ही या पुस्तकात समावेश केलेली प्रकरणं. या नावांवरून श्रीखंडे यांचा व्यासंग आणि चोखंदळपणा अधोरेखित होतो. विशेष म्हणजे केन्यूट हॅमसनचं ‘हँगर’, आंथनी होपचं ‘द प्रिझनर ऑफ झेंडा’, मिगेल आस्टोरियसचं ‘द प्रेसिडेंट’ या पुस्तकांचा वेध घेण्यास श्रीखंडे विसरलेले नाहीत. ‘अक्षरविश्व’ वाचताना एक कुतूहल घर करून राहतं ते म्हणजे त्यांनी साहित्यकृतींची निवड कोणत्या निकषांवर केली असेल?

‘अक्षरविश्व’ या पुस्तकाचं ठळक वैशिष्टय़ म्हणजे 214 पृष्ठांचं हे साहित्य वाचायला कुठूनही सुरुवात करा, ते वाचकांना खिळवून ठेवतं.  उदाहरणार्थ, जॉर्ज अमादूचं ‘कॅप्टन्स ऑफ द सॅन्ड’ हे प्रकरण. यात श्रीखंडे यांनी अमादूविषयी माहिती दिली आहे. त्याने कायद्याचं शिक्षण घेतलं, पण वकिली केली नाही. त्याची डावी विचारसरणी होती. त्यामुळे ब्राझीलच्या हुकूमशाहीत त्याला तुरुंगात जावं लागलं. त्याची पुस्तकं जाळण्यात आली. त्यावर बंदी घालण्यात आली. पुढे मात्र त्याला लोकप्रियतेचा वरदहस्त लाभला. तो जगविख्यात झाला. मग त्याला राजकारणाचा मोह झाला. त्याने निवडणूक लढवली. तो सिनेटमध्ये निवडून आला. त्याची ‘कॅप्टन्स’ ही कादंबरी अद्भुत आहे. बहिया प्रांताचं जिवंत वर्णन त्यात आहे. सामाजिक विषमता, बाल गुन्हेगारी, प्रेमसंबंधाची वीण, क्राऊर्य, लैंगिकता असे नानाविध छटा या कादंबरीत आहेत. पेड्रॉ बाला – द बुलेट हा त्या कादंबरीचा नायक. त्याची जीवन सरिता वाचणं हा एखादा क्लासिक सिनेमा पाहण्यासारखा अवीट आनंदाचा अनुभव आहे.

जोनाथन स्विफ्टचे ‘गलिव्हर्स ट्रव्हल’ हे असंच एक अद्भुत प्रकरण आहे. जोनाथनने आपल्या वडिलांना पाहिले नाही. त्यांचं निधन झाल्यावर सात महिन्यांनी जोनाथनचा जन्म झाला. ‘आरिस्टॉटलचं तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान’ हे त्याचे अभ्यासाचे विषय होते. इंग्रजीतला सर्वात महान विडंबनकार म्हणून त्याची ख्याती झाली. अनाकलनीय बाब म्हणजे जोनाथनने 1731 रोजी स्वतचा मृत्युलेख प्रसिद्ध केला. पुढे तब्बल 14 वर्षांनी त्याचं निधन झालं. ‘गलिव्हर्स ट्रव्हल्स’ ही कादंबरी अमूर्त अशा काल्पनिक सफरनाम्यावर बेतलेली आहे. गलिव्हर प्रवासाला निघतो. त्याचं जहाज बुडतं. तो पोहत किनाऱयावर पोचतो. तो सहा इंची बुटक्या माणसांचा प्रदेश असतो. त्याचं नाव लिलीपूट. तेथे तो जीवनाचे चित्रविचित्र अनुभव घेतो. ते वाचणं विलक्षण आहे.

‘अक्षरविश्व’ लिहिताना लेखक श्रीखंडे यांनी दोन हेतू साध्य केले आहेत. एक म्हणजे 470 वर्षांतल्या उत्कृष्ट 22 साहित्यकृतींची यथायोग्य, पण थोडक्यात माहिती करून दिली आहे. शिवाय या 22 साहित्यकारांचा जीवनपट उलगडला आहे. प्रत्येक साहित्यिकाची जीवन कहाणी म्हणजे स्वतंत्र चरित्र – कादंबरीचा विषय आहे. पुस्तक वाचत असताना त्या त्या वेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यावर श्रीखंडे यांनी प्रकाशझोत टाकला आहे. तसेच साहित्यिकांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनाचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक माहितीपूर्णच नव्हे, तर सुरसही झालं आहे.

अभिजात साहित्याचे अक्षरविश्व!

लेखक ः राजीव श्रीखंडे

प्रकाशक ः ग्रंथाली

मूल्य ः 350 रुपये

पृष्ठे ः 214