सिनेमा- जेन-झीचा ‘रॉकस्टार’?

>> प्रथमेश हळंदे

‘सैयारा’ रिलीज होऊन साधारण तीन आठवडे उलटून गेलेत, पण अजूनही या सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर गारुड कायम आहे. अनेक नव्या-जुन्या ब्लॉकबस्टर बॉलीवूडपटांच्या कमाईचे विक्रम मोडत ‘सैयारा’ची घोडदौड सुरूच आहे. असं असलं तरी ‘सैयारा’ची क्रेझ ही फक्त बॉक्स ऑफिसच्या आकडय़ांपुरती मर्यादित राहिलेली नाही. समाज माध्यमांवर फिरत असलेले प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे व्हिडीओ या आकडय़ांहून अधिक बोलके आहेत. 

‘सन ऑफ सरदार 2’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची आणि अवघ्या चार दिवसांत ‘सैयारा’ने 100 कोटींची कमाई केल्याची बातमी लागोपाठ वाचनात आली. याला निव्वळ योगायोग निश्चितच म्हणता येणार नाही. ‘सन ऑफ सरदार 2’ च्या टीमने कितीही तांत्रिक अडचणींचे पाढे वाचले तरी ‘सैयारा’ने मिळवलेल्या प्रसिद्धीच्या गजबजाटात ते ऐकले जाण्याची शक्यता कमीच आहे. या सिनेमाचं यश मोजायचं झालं तर अजय देवगणसारख्या स्टार अभिनेत्याला आपला सिनेमा पुढं ढकलावा लागतो, हे चित्र फारच बोलकं आहे.

वास्तविक ‘सैयारा’ हा एक सर्वसाधारण रोमँटिक सिनेमा आहे. संगीतक्षेत्रात देदीप्यमान कारकीर्द घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेला नायक आणि बोलण्यापेक्षा लिहिण्यातून स्वतचा आवाज मांडू पाहणारी नायिका अशा एका तरुण जोडप्याची ही गोष्ट आहे. आपापला वाईट भूतकाळ मागे सोडून दोघेही एकत्र येतात. दोघांचं प्रेम ऐन बहरात असतानाच नायिकेला अल्झायमर असल्याचं निदान होतं आणि कथा वेगळं वळण घेते. जोडीदारांपैकी एखाद्याला स्मृतिभ्रंश होणं, दुसऱयाने प्रेमापोटी त्या व्यक्तीची काळजी घेणं आणि त्या एकतर्फी प्रेमाची शोकांतिका होणं अशा धाटणीची कथानकं आपल्याला नवी नाहीत. त्यात शोकांतिका असलेल्या प्रेमकथांशी प्रेक्षकांचे भावनिक बंध जुळणं आणि त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण प्रसिद्धी लाभणं, हे तर नेहमीचंच समीकरण आहे.

गेल्या काही दिवसांत ‘सैयारा’ पाहून अतिभावनिक झालेल्या अशाच काही प्रेक्षकांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होतायत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अगदी नगण्य म्हणावं असं प्रमोशन आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मात्र या अशा व्हिडीओंची रांगच लागलीय. बॉक्स ऑफिसवर नोंदवले जाणारे आकडे तर कौतुकास्पद आहेतच, पण त्याहून जास्त लक्षवेधक आहे तो या प्रेक्षकांचा भावनिक उद्रेक. सिनेमा संपल्यावर अनेक जण ढसाढसा रडताना, दुःखाने ओरडताना दिसतायत. अगदी काही महिन्यांपूर्वीच ‘सनम तेरी कसम’ पुनप्रदर्शित झाल्यानंतर असंच चित्र पाहायला मिळालं होतं. आता ‘सैयारा’च्या निमित्ताने तशाच प्रतिसादाची पुनरावृत्ती पाहायला मिळतेय. पण खरी मेख इथंच आहे की ‘सैयारा’ ही शोकांतिका नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा भावनातिरेक समजून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं.

या भावनातिरेकाचं खरं श्रेय ‘सैयारा’च्या मार्केटिंग टीमला द्यायला हवं. असं म्हणलं जातं की, त्यांनी सोशल मीडिया विशेषत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून आपला टार्गेट ऑडियन्स जमा केला. मोठमोठय़ा पेजेसला पैसे देण्याऐवजी त्यांनी टीयर-2, टीयर-3 शहरांमध्ये चांगला रीच असलेल्या इन्स्टाग्राम पेजेसला ट्रेलरमधले काही प्रसंग एडीट करायला दिले. या पेजेसला फॉलो करणारा, त्यावरचा आशय आवडणारा मोठा वर्ग हा आजच्या भाषेत जेन-झी म्हणून ओळखला जातो. या पेजेसच्या माध्यमातून ट्रेलरमधल्या काही खास सीन्सचं चांगलं एडिटिंग करून या जेन-झी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं. त्यामुळे आपला अपेक्षित प्रेक्षकवर्ग तयार करण्यात ‘सैयारा’ पुरेपूर यशस्वी ठरला.

एक विशेष गोष्ट म्हणजे ‘अ मोमेंट टू रिमेम्बर’ या जुन्या लोकप्रिय साऊथ कोरियनवरून ‘सैयारा’ प्रेरित आहे, असं म्हणलं जातं. ‘सैयारा’चा दिग्दर्शक मोहित सुरीचं कोरियन सिनेमांवरचं प्रेम याधीही उघड झालेलं आहे. अर्थात त्याने वेळोवेळी हे नाकारलं असलं तरी सुज्ञांस सांगणे न लगे! गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमांच्या कृपेने चांगला साऊथ कोरियन कंटेंट भारतीयांपर्यंत पोहोचतोय आणि गंमत म्हणजे भारतात हे साऊथ कोरियन ड्रामा आणि म्युझिक अर्थात के-ड्रामा आणि के-पॉप सर्वाधिक फॉलो करणारा प्रेक्षकवर्गही जेन-झीच आहे. त्यामुळे ‘सैयारा’च्या टीमचा बाण अगदी अचूक जागेवर लागलाय, थिएटरमध्ये दिसणाऱया रडारडीमागे प्रेक्षकांनी सिनेमात केलेल्या भावनिक गुंतवणुकीपेक्षा मार्केटिंग टीमने त्या प्रेक्षकांमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूकच जास्त असल्याची शक्यता मनात जोर धरते. मार्केटिंगमधली दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमातल्या प्रमुख कलाकारांना पूर्वप्रसिद्धीतून मिळणारं एक्स्पोजर. ‘सैयारा’च्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. साहजिकच अत्यंत जजमेंटल असणाऱया जेन-झी प्रेक्षकांच्या नजरेत दोन्ही कलाकारांची प्रतिमा ही चांगलीच राहिली.

असं असलं तरी ‘सैयारा’च्या एकंदर यशाचं संपूर्ण श्रेय सिनेमाच्या मार्केटिंगला देणं अयोग्य ठरेल. बऱयाच काळाने यशराज फिल्म्सने रुपेरी पडद्यावर एक प्रेमकथा आणलीय. गेल्या काही काळापासून सातत्याने मारधाडपटांचा बोलबाला दिसून येतोय. कोण किती हिंसक आशय पडद्यावर आणतो याची ही स्पर्धाच लागलीय जणू! अगदी कालातीत प्रेमकथा पडद्यावर साकारण्यासाठी परिचित असलेली ‘यशराज’सारखी निर्मिती संस्थाही या ‘वॉर’मध्ये आपल्या ‘शमशेरा’ पाजळताना दिसली. त्यामुळे ‘यशराज’ने पुन्हा प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आणणं हे खास कारण आहेच. त्याचबरोबर सिनेमाची कथा अगदीच साधारण आहे आणि त्यामुळे त्यातील पात्रांना योग्य ती खोली लाभत नाही, ही उणीव भासूनही सिनेमा मनाला भिडतो. याचं कारण म्हणजे प्रमुख कलाकारांचा अभिनय आणि सिनेमाचं संगीत. अहान आणि अनीत या जोडगोळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर लेखनातल्या भावनिकतेचा अभाव दूर करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना तितकीच मोलाची साथ सिनेमातल्या संगीताने दिली आहे.

प्रत्येक पिढीला स्वतसोबत रिलेट करता येईल अशी एखादी प्रेमकहाणी पडद्यावर हवीच असते. अगदी ‘तेरे नाम’, ‘एक दुजे के लिए’, ‘आशिकी’, ‘कयामत से कयामत तक’पासून ते आता आताच्या  ‘रॉकस्टार’, ‘आशिकी 2’ पर्यंत अनेक हिट सिनेमांनी आधीच्या पिढय़ांची ही भूक भागवलीय. आता यात जेन-झी आणि ‘सैयारा’ या समीकरणाची भर पडलीय. अशा वेळी पेड प्रमोशनचा मुद्दा एकवेळ बाजूला सारून जेन-झीची प्रेम व्यक्त करण्याची आणि प्रेमभंग किंवा तत्सम घटनांकडे पाहण्याची दृष्टी कशी विकसित होतेय, हे यानिमित्ताने मानसशास्त्राrय दृष्टिकोनातून समजून घेणंही आवश्यक आहे. पोक्तपणाचा आव आणून हा प्रतिसाद बेदखल करण्याऐवजी पिढी-दर-पिढी रुंदावत जाणाऱया भावनिक दरीचं एक जिवंत उदाहरण म्हणूनही या प्रतिसादाकडे डोळसपणे पाहायला हवं. हे सगळं लक्षात घेता अतिशयोक्ती वाटत असली तरी या सिनेआशयाचा बाज आणि त्यासाठी वेडावलेला प्रेक्षकवर्ग पाहता ‘सैयारा’च्या निमित्ताने जेन-झीला त्यांचा ‘रॉकस्टार’ मिळालाय असं नमूद करावंसं वाटतं.

[email protected]

(लेखक सिनेमा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)