रेल्वे स्थानकांत झोपणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफचा वॉच, ‘एलिव्हेटेड डेक’साठी खबरदारी

उपनगरी रेल्वे मार्गावरील स्थानकांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने ‘एलिव्हेटेड डेक’च्या कामांना गती दिली जात आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमार्फत (एमआरव्हीसी) 16 स्थानकांमध्ये ‘एलिव्हेटेड डेक’ उभारला जाणार आहे. या सुविधेचा विस्तार करताना रेल्वे प्रशासनाला रात्री ‘एलिव्हेटेड डेक’वर झोपणाऱ्यांची संख्या वाढण्याची चिंता सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकात झोपणाऱ्या प्रवाशांवर ‘वॉच’ ठेवून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

एमआरव्हीसीने सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील खार स्थानकामध्ये ‘एलिव्हेटेड डेक’ उभारला आहे. नेरळ, कसारा, कांदिवली, मीरा रोड या स्थानकांमध्ये डिसेंबर 2025पर्यंत ‘एलिव्हेटेड डेक’ होणार आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा व्हावी हा यामागचा  हेतू आहे. या हेतूला स्थानकामध्ये रात्री झोपणाऱ्या प्रवाशांमुळे धक्का बसत आहे. रेल्वे स्थानकांच्या आवारात प्रतिबंधित क्षेत्रे नसल्याने प्रवाशांकडून उपलब्ध जागेचा गैरवापर होतो. विविध रेल्वे स्थानकांत ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी करताना त्या क्षेत्रात रात्रीच्या सुमारास झोपणाऱ्या प्रवाशांचे आव्हान रेल्वे प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. या प्रश्नाकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहतो. त्या अनुषंगाने खबरदारी घेऊन आरपीएफमार्फत कारवाईची मोहीम हाती घेतली जात आहे, असे पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ

रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपणाऱ्यांमध्ये शेवटची ट्रेन चुकलेले प्रवाशी तुलनेत फारच कमी असतात. अनेक कुटुंबे नेहमीच रेल्वे स्थानकामध्ये झोपायला येतात. त्यात गर्दुल्ले, मद्यपींचे प्रमाण अधिक असते. एलिव्हेटेड डेक प्रकल्पांचा विस्तार करताना अशा लोकांचा उपद्रव वाढण्याची चिंता सतावत आहे. त्यांना रोखण्यासाठी आरपीएफने रात्रीच्या सुमारास गस्त वाढवली आहे.