सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांना धक्का; अजितदादा घेणार ऊसतोड महामंडळाचा ताबा

लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून संजय शिरसाट यांनी केलेला थयथयाट अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गुरुवारी बीड दौऱयावर आलेल्या अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडून काढून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी करताच त्याला तत्परतेने होकार दिला. एवढेच नाही तर आपण स्वतः याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू, असा शब्दही त्यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्यानंतर त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रचंड थयथयाट केला होता. सामाजिक न्याय खातेच बंद करा, असे त्यांनी अर्थमंत्री अजित पवारांना सुनावले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांनी अजितदादांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र शिरसाटांनी केलेला पाणउतारा अजितदादांनी लक्षात ठेवून बीड दौऱयावर येताच त्याचा वचपा काढला.

माझ्याकडे जादूची कांडी नाही

बीड जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बीड शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. जिल्हा क्रीडा मैदानावर जनतेशी संवाद साधताना त्यांनी त्रागा केला. एका दिवसात विकास होत नसतो. माझ्या हातात जादूची कांडी नाही. तुम्हीच आतापर्यंत चुकीची माणसे निवडून दिली. त्यांनी बीड शहराची वाट लावली. संयम राखा, मी लोकांचा रोष घ्यायला तयार आहे, बीड शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देवू, त्यात तुमचीही साथ मला हवी आहे, असे म्हणत योगेश क्षीरसागर यांच्यासमोरच त्यांनी क्षीरसागरांवर तोफ डागली.