
मुंबईच्या रस्त्यांवर अनधिकृतरीत्या धावणाऱया रॅपिडो बाईकवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. मंत्रालयाजवळ एका रॅपिडो बाईकस्वारावर कारवाई केल्याचेही दाखवले होते. परंतु त्याच रॅपिडो कंपनीकडून सरनाईक यांचा मुलगा विहंग याने त्याच्या प्रो-गोविंदा स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करून प्रताप सरनाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘परिवहन मंत्र्यांचा डबल धमाका… रॅपिडो बाईक आली..त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली…बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली… मंत्र्यांनी ‘रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली…’ असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे यावरून स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की, हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना? असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.
स्टंट करून इव्हेंटसाठी पैसे उभे केले
‘परिवहन मंत्री सरनाईक यांनी रॅपिडोवर कारवाईचा स्टंट करून मुलाच्या इव्हेंटसाठी पैसे उभे केले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट आहेत महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना निधी कसा उभा करायचा, याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिला,’ असे वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.