
ICICI बँकेनंतर आता HDFC बँकेनेही बचत खात्यांसाठीचे नियम कडक केले आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून, शहरी आणि निमशहरी भागात नवीन खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम 25 हजार रुपये आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये करण्यात आली आहे. हा नियम पगार आणि BSBDA खात्यांना लागू होणार नाही.
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC नेही त्यांच्या बचत खात्याची किमान शिल्लक रक्कम वाढवली आहे. पूर्वी ही मर्यादा 10 हजार रुपये होती. ती आता 25 हजार रुपये करण्यात आली आहे. तुमच्या खात्यात ही रक्कम नसेल तर बँक शुल्क आकारू शकते. परंतु हा नियम फक्त अशा ग्राहकांना लागू होईल ज्यांनी 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन खाते उघडले आहे. जुन्या ग्राहकांना अद्याप याचा परिणाम झालेला नाही.
एचडीएफसी बँकेने त्यांच्या बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. विशेषतः महानगरे आणि शहरी भागातील शाखांसाठी लागू करण्यात आला आहे. आता या भागात खाते असलेल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात नेहमीच किमान 25 हजार रुपये ठेवावे लागतील. खात्यातील शिल्लक या मर्यादेपेक्षा कमी झाली तर बँक दरमहा शुल्क आकारेल.
एकीकडे सरकारी बँका बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम काढून टाकत आहेत. त्याच वेळी खाजगी बँका बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवत आहेत. अलिकडेच आयसीआयसीआय बँकेने बचत खात्याच्या नियमांमध्ये आणि काही सेवा शुल्कात मोठे बदल केले आहेत. आयसीआयसीआय बँकेत नवीन बचत खाते उघडत असाल तर तुम्हाला खात्यात 10 हजार रुपयांऐवजी किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आहे. हा नियम फक्त नवीन उघडलेल्या बचत खात्यांसाठी आहे.