
यंदापासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱया गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह व्याख्याने, लोककलांच्या आविष्काराच्या कार्यक्रमांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी या महोत्सवासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे. राज्यात पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री
ऍड. आशिष शेलार यांनी केली होती.



























































