बेस्ट पतपेढीच्या सत्तेसाठी जेवणावळी, पैशांचे वाटप! सहकार समृद्धी पॅनलकडून आचारसंहिता भंग 

बेस्ट कामगार पतपेढीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार समृद्धी पॅनलकडून मतदारांना पैशांचे वाटप करून जेवणावळीदेखील घातल्या गेल्या, असा आरोप ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. आचारसंहिता लागू असताना संबंधित पॅनलने डेपोंमध्ये जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे सहकार समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतून बाद करावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेना-मनसे पुरस्कृत उत्कर्ष पॅनलने मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

सुहास सामंत यांनी निकालानंतर अनेक आक्षेप घेतले असून बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेना-कर्मचारी सेनेकडून उत्कर्ष पॅनलचे उमेदवार स्वामी माळी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांच्याकडे तक्रार केली आहे. निवडणुकीत आचारसंहिता भंग करणाऱया प्रसाद लाड यांच्या सर्व उमेदवारांना निवणूक प्रक्रियेतूनच बाद करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

उत्कर्ष पॅनलचे आरोप

सहकार समृद्धी पॅनलने आधी प्रत्येक आगारात स्नेहभोजनाची परवानगी मागितली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने परवानगी नाकाराली. तरीदेखील सहकार पॅनलने 14 ऑगस्ट रोजी आगाराबाहेर स्नेहभोजन आयोजित केले.

आचारसंहिता असतानाच घाटकोपर कर्मचारी वसाहतीत जाहीर प्रचार केला. परळ बेस्ट कर्मचारी वसाहतीत या पॅनलकडून पैशांचे वाटप करताना रंगहाथ पकडले. सदस्यांच्या घरोघरी जाऊन पॅनलच्या पत्रासह 1500 रुपयांचे वाटप करण्यात आले.

बेस्टची निवडणूक लहान,  फारशी महत्त्वाची नाही  – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारले असता, ही निवडणूक फारशी महत्त्वाची नाही. मला बेस्ट पतपेढी निवडणूक हा विषयच माहीत नाही. या छोटय़ा निवडणुका आहेत. लहान गोष्टी आहेत. स्थानिक निवडणुका आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. माध्यमांना 24 तास काहीतरी दाखवायला हवे म्हणून याची आग लाव, त्याची आग लाव, असे प्रकार चालतात असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.