झुकरबर्गच्या सुरक्षेवर 221 कोटी खर्च; मस्क यांच्यासाठी 20 बॉडीगार्ड, दिग्गज टेक कंपन्यांचा सुरक्षेवरील खर्च वाढला

जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या वैयक्तिक सुरक्षेवर भरमसाठा खर्च केला जातोय. एका अहवालानुसार, 2024 मध्ये 10 मोठय़ा टेक कंपन्यांनी त्यांच्या सीईओंच्या सुरक्षेवर 369 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. यातील सर्वात मोठा भाग मेटाप्रमुख मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा होता, ज्यावर सुमारे 221 कोटी रुपये खर्च करण्यात आला.

डेटाचा गैरवापर, मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या काढून टाकणे, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती आणि राजकारणात थेट हस्तक्षेप यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सामान्य जनतेच्या रोषाचे लक्ष्य बनले आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षेची गरज भासत आहे.

< 2024 मध्ये मेटाने झुकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर 221 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथील निवासस्थानाची सुरक्षा आणि प्रवास सुरक्षा यांचा समावेश आहे.

< टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आकडा सार्वजनिक नाही, परंतु टेस्लाने 2023 मध्ये त्याच्या सुरक्षेवर 21 कोटी रुपये खर्च केले होते. मस्क आता त्यांच्या स्वतःच्या फाऊंडेशन सिक्युरिटी कंपनीद्वारे त्यांची सुरक्षा व्यवस्थापित करतात आणि 20 अंगरक्षकांसह प्रवास करतात.

< जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर ऍमेझॉन दरवर्षी सुमारे 13 कोटी खर्च करते. सध्याचे सीईओ अँडी जॅसी यांच्यासाठी कंपनीचे सुरक्षा बजेटही दरवर्षी वाढत आहे.

< जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डायमन आणि एनव्हीडियाचे सीईओ हुआंग आहेत. हुआंगच्या सुरक्षेसाठी 29 कोटी खर्च 2024 मध्ये एनव्हीडियाने खर्च केले.

< 2024 मध्ये, अमेरिकन आरोग्य सेवा कंपनी युनायटेड हेल्थ केअरचे प्रमुख ब्रायन थॉम्पसन यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोराला सोशल मीडियावरही मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळाला, ज्यामुळे कॉर्पोरेट जगत हादरले.