Thane News – मिरारोडमध्ये अंगावर स्लॅब पडून 4 वर्षीय बालकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

मिरारोड पूर्वेला एका 40 वर्षे जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळून चार बालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तीन जण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वोखार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभाग, प्रभाग अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरारोड पूर्वेच्या नयानगर परिसरात असलेल्या नूरजहाँ इमारत नं. 51 मध्ये ही दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी ही घटना घडली.

तिसऱ्या मजल्यावरील रूम नं. 302 चा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील रूम नं. 202 मध्ये कोसळला. स्लॅब अंगावर पडून अब्दुल अहद या 4 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर नसीम अन्सारी (42), फरिदा खान (45) आणि नासिरा खान (22) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

सदर इमारत तळमजला अधिक चार मजल्याची असून या इमारतीत एकूण 18 फ्लॅट आणि 13 दुकाने आहेत. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत ही इमारत घोषित केली नव्हती, मात्र ती 40 वर्षीय जुनी इमारत होती. पालिका प्रभाग अधिकारी यांनी डिसेंबर 2024 मध्ये सदरील इमारतीला संचरणात्मक बांधणी अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट) महापालिकेत सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र तिथल्या चेअरमन, सेक्रेटरी यांनी तसा अहवाल सादर केला नाही.