नांदेड जिल्ह्यात 17 मंडळात अतिवृष्टी; निझामसागर धरणाचे 29 दरवाजे उघडले, रेल्वे वाहतूकही विस्कळीत

नांदेड जिल्ह्याला बुधवारी रात्री ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्य अंदाजनुसार जिल्ह्याला मुसलधार पावसाने झोडपले आहे. बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी पुन्हा एकदा शेतात पाणी साचले आहे. निजामसागर धरणाचे सकाळी २४ गेट उघडल्याने धर्माबाद, बिलोली, नायगाव या तालुक्याला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्याचे सर्वत्र हाहाकार उडाला असून उरली सुरली शेतातील पिके नष्ट झाली आहेत. तेलंगणा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

17 ऑगस्टनंतर काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यातील १७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, कंधार, नायगाव, लोहा, मुखेड, बिलोली, धर्माबाद या तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नरसी, नायगाव परिसरात पाण्याचा जोर वाढल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले असून अनेक मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.

कापशी ते मारतळा या मार्गावर वाका येथे नदीजवळ पुलावरुन पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. पूरग्रस्त मुक्रमाबाद परिसरातील हसनाळ व अन्य गावामध्ये जोरदार अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नरसी ते मुखेड हा रोड बंद पडला आहे. आकनपेठ ते मेडक सेक्शन मार्गावर मुसळधार पाऊस झाल्याने वेळापत्रक कोलमडले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या वाढ झाल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले असून देगलूर ते उदगीर रोड बंद झाला आहे.

गोदमगाव, परडवाडी, कोलंब, कहाळा पुर, चिखली, वेरुळ, दहीकळंबा, सावळेश्वर या कंधार तालुक्यातील गावात घरात पाणी शिरले आहे. लोहा तालुक्यातील कापशी, बिलोली तालुक्यातील येसगी या गावातही पाणी शिरले आहे. निजामसागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्यााचा विसर्ग होत असल्याने शेळगाव, जुने मेदनकल्लूर, सांगवी उमरी, तमलूर या गावात पाणी शिरल्याने प्रशासनाने दिड हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्याठिकाणी एसडीआरएफची टिम तैनात करण्यात आली आहे. एकंदर पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून १७ मंडळात अतिवृष्टी झाल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. ज्या १७ मंडळात अतिवृष्टी झाली त्यात बिलोली, आदमपूर, लोहगाव, रामतिर्थ, मुखेड, जांब, येवती, चांडोळा, बार्‍हाळी, मुक्रमाबाद, कुरुळा, दिग्रस, बरबडा, कुंटूर, नरसी, नायगाव, मांजरम या मंडळाचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लोहगाव मंडळात नोंदल्या गेला असून तो 115 मि.मी. एवढा आहे.