
2018 मध्ये बिटकॉइन लूट आणि अपहरण प्रकरणात अहमदाबाद शहर सत्र न्यायालयाच्या एसीबी न्यायालयाने आज भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना जन्मङ्गेपेची शिक्षा सुनावली. भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया, अमरेलीचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल आणि माजी पोलीस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह 14 आरोपींचा यात समावेश आहे.
2018 मध्ये सुरतचे विकासक शैलेश भट्ट यांनी माजी आमदार आणि माजी पोलीस अधीक्षकांवर अनेक गंभीर आरोप केले. एका प्रकरणात चौकशीच्या बहाण्याने अमरेली जिह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना एका अज्ञात स्थळी नेऊन डांबून ठेवल्याचा आरोप भट्ट यांनी केला. इतकेच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून 12 कोटी रुपयांच्या किमतीचे बिटकॉइन आपल्या खात्यात वळते करून घेतले. या कटात भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया यांचाही सहभाग होता. तसेच भट्ट यांनी आपला साथीदार किरीट पलाडिया याच्यावरही आरोप केले होते. सीआयडी तपासात भट्ट यांनी केलेले आरोप सिद्ध झाले. किरीट पलाडिया यानेच हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले.
महाराष्ट्रातून अटक झाली होती माजी आमदाराला
गुजरात सरकारने या हायप्रोफाइल प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवली होती. 2018 मध्येच एसपीसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. माजी भाजप आमदार नलिन कोटडिया फरार झाला होता. त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर महिनाभराने म्हणजेच सप्टेंबर 2018 मध्ये कोटडियाला महाराष्ट्रातील धुळे येथून अटक करण्यात आली होती.