राज्य अस्थिर व्हावे, फडणवीस अडचणीत यावे यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्ती पडद्याआडून काम करताहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

गावागावात भीमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात, आंदोलनं-संघर्ष व्हावा, राज्य अस्थिर व्हावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत यावे यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्त पडद्याआडून काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी जातीजातीत संघर्ष लावणाऱ्या भाजपचाही समाचार घेतला.

मराठ्यांचा ओबीसीत समावेश कराल तर मुंबई जाम करू, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे किंवा भाजपचे हेच राजकारण आहे. दोन मुख्य समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहून रक्तपात, संघर्ष करावा. कुठे आहेत उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, इतर सर्व मराठे नेते? छगन भुजबळ सांगताहेत मी ओबीसी नेता म्हणून मंत्रिमंडळात आहे. हे कौतुकास्पद आहेत. इतर कुणी सांगतेय का? हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून, महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाच्या आर्थिक विषयाशी आणि जीवन मरणाशी संबंधित आहे.

आंदोलन चिघळावे आणि भीमा कोरेगावसारखे हिंसक आंदोलन महाराष्ट्रात घडावे असे काही लोकांना वाटत आहे. ही माझी पक्की माहिती आहे. जसे भीमा कोरेगाव दंगलीमागे काही शक्ती काम करत होत्या, तशा प्रकारे आंदोलन चिघळावे, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्ती काम करत आहेत. फडणवीस यांनाही हे पक्के माहिती आहे, असा दावाही राऊत यांनी केला. म्हणून हा विषय सरकारच्या अखत्यारित्यातील आहे न्यायालयाच्या नाही, असेही ते पुढे म्हणाले.

गावागावात भीमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात, आंदोलनं-संघर्ष व्हावा आणि राज्य अस्थिर व्हावे यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्ती पडद्याआडून काम करत आहेत. हे फडणवीस यांना माहिती आहे. शिवसेना फोडून त्यांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे. आता त्यांना कळेल की त्यांनी या राज्यामध्ये किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहे आणि स्वतच्या बुडाला आग लावून घेतलेली आहे, असेही राऊत म्हणाले.

जबरदस्तीने हटवायला आंदोलक उपरे आहेत की घुसखोर? संजय राऊत यांचा सवाल, जरांगेंना ब्रेबॉर्न स्टेडियमवर जागा देण्याची मागणी

पडद्यामागील शक्ती कोण आहे? मित्रपक्षातील की स्वपक्षातील? असे विचारले असता राऊत म्हणाले की, नक्कीच त्यांच्या मित्रपक्षातील आहे. या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न करत असतील तर न्यायालयाने ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पहावे. सरकारने खास करून अमित शहा यांनी पहावे. कारण शहांच्या पाठींब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळे करू शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एकमोठा गट प्रयत्न करत आहे, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.

सरकारला आदेश! आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!! मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी, आंदोलन शांततेत नव्हते! अटी आणि शर्तींचे उल्लंघन झालेय!!