
गणपती विसर्जनावेळी शहापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. आरती सुरू असताना नजीकच्या लहान बंधाऱ्यातून पोहण्यासाठी एका तरुणाने उडी मारली. यावेळी त्या तरुणाला बुडताना पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची घटना आसनगाव येथील रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या भारंगी नदीत घडली. पाच तरुणांचा शोध सुरू असताना एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. तर वाचविण्यात आलेल्या दोघांवर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसनगाव येथील मुंडेवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू असताना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
शिवतेज मित्र मंडळातील प्रतीक मुंडे असे मृत तरुणाचे नाव आहे. रामनाथ घारे आणि भगवान वाघ यांच्यावर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुलदीप जाखेरे आणि दत्ता लोटे यांचा जीव रक्षक टीम व शिवतेज मित्र मंडळातील तरुणांकडून शोध सुरू आहे. भारंगी नदी काठी मंडळाच्या गणपती विसर्जनाआधी आरती सुरू होती. त्यावेळी दत्ता लोटे हा पोहण्यासाठी नजीकच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या भारंगी नदीत गेला होता. गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने भारंगी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ व कुलदीप जाखेरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या. यावेळी प्रसंगावधान राखत मित्रांच्या मदतीने योगेश्वर नाडेकर याने पाण्यात उतरून रामनाथ व भगवान या दोघांना मोठ्या शिताफीने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर जीवरक्षक टीम व मंडळातील मित्रांनी शोध घेतल्यानंतर प्रतीक मुंडे या तरुणाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, कुलदीप जाखेरे व दत्तू लोटे या तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.