‘देवाभाऊ’… कोट्यवधींच्या जाहिराती कोणी दिल्या? विरोधकांचा जोरदार हल्ला

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी कोटय़वधी रुपयांच्या निनावी जाहिराती देण्यात आल्या. या जाहिराती भाजपच्या नव्हे तर मित्रपक्षाच्या मंत्र्याकडून दिल्या गेल्याचे समोर येऊ लागल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे.

अनंत चतुर्दशीदिवशी राज्यातील सर्वच दैनिकांमध्ये या जाहिराती पहिल्या आणि दुसऱया पानावर झळकल्या. ‘देवाभाऊ’ म्हणत त्या कोटय़वधींच्या निनावी जाहिराती नेमक्या कोणी दिल्या? असा सवाल करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर चर्चा सुरू झाली. या जाहिरातींचा खर्च भाजपच्या नव्हे तर मित्रपक्षाच्या मंत्र्याने केल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असेदेखील कळत आहे, असे रोहित पवर यांनी नमूद केले आहे.

पैसा ठेकेदार, बिल्डर की अंडरवर्ल्डचा? – संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी ती जाहिरात कोणी दिली? जाहिरातीवर कोणत्याही दात्याचे नाव नाही मग त्यासाठी लागणारा 40-50 कोटींचा खर्च कुठून आला? जाहिरातींचा पैसा ठेकेदारांचा, बिल्डरांचा की अंडरवर्ल्डचा? असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे, पण भाजपनेच ही जाहिरात दिलीय याची मला खात्री आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर आणि स्मारकाच्या आश्वासनावरूनही त्यांनी भाजपला धारेवर धरले.

बॅनर लावा, काहीही करा मात्र प्रमाणपत्रे द्या – मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. कुणी बॅनर लावा किंवा काहीही करा, आम्ही तुमचे आभारच मानतो आहोत, काwतुकही करतो आहोत. मात्र आता तातडीने मराठय़ांना प्रमाणपत्रे द्या अशी आमची मागणी आहे, असे जरांगे म्हणाले. गरीब मराठय़ांनी लढाई जिंकली आहे त्यामुळे आता कोण काय बरळतेय त्याकडे लक्ष देऊ नका. कुणाचेच ऐकायचे नाही, जीआरमधील एखाद्या शब्दामुळे प्रमाणपत्रे द्यायला काही प्रश्न आलाच तर तो शब्द आपण सुधारून घेऊ. मराठवाडय़ातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे, असेही ते पुढे म्हणाले.