
आशिया खंडातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक प्रमुख बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर(तवा) ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील भरवीर (इगतपुरी) येथे जोडणाऱ्या फ्राईट कॉरिडॉर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सुमारे 2 हजार 528 कोटी 90 लाख रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येणार आहे. यामुळे वाढवण बंदरातून थेट नाशिकपर्यंतची मालवाहतूक अत्यंत वेगाने होणार आहे.
वाढवण बंदर(तवा) ते भरवीर येथे जोडणाऱ्या फ्राईट कॉरिडॉरच्या बांधकामास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झाला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकल्पाची किंमत
रस्ते विकास महामंडळामार्फत तत्काळ हाती घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत दीड हजार कोटी रुपये आणि त्यावरील व्याज 1 हजार 29 कोटी 90 लाख रुपये असे एकूण 2 हजार 528 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
रस्ते विकास महामंडळामार्फत
सुमारे 104.898 किमी लांबीचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.