
चारित्र्याच्या संशयातून पत्नीला रॉकेल ओतून मारणाऱ्या माथेफिरू नवरोबावर नवी मुंबई पोलिसांनी सहा वर्षांनंतर झडप घातली आहे. मनोहर सरोदे असे या खुन्याचे नाव असून तो हैदराबाद येथे पिंटू सिंग या नावाने राहत होता. मात्र पोलिसांनी बंद झालेली क्राइम फाईल पुन्हा उघडत मोठ्या शिताफीने मनोहरला अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या सक्सेस स्टोरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कामोठे येथील जुई गावात एका भाड्याच्या घरात मनोहर सरोदे (५०) आणि त्याची पत्नी आणि मुले असे कुटुंबीय राहत होते. ४ डिसेंबर २०१९ रोजी मनोहरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने या घटनेनंतर मनोहरच्या गावापर्यंत शोध घेतला, परंतु अनेकदा शोध घेऊनही मनोहर सापडत नसल्याने हे प्रकरण २०२३ मध्ये बंद करण्यात आले होते. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ज्या प्रकरणातील आरोपी अनेक वर्षे फरार आहेत अशांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
जावई आणि मुलीचा मोबाईल केला ट्रॅप
मनोहरच्या एका दूरच्या नातेवाईकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मनोहर सध्या स्वतःचे नाव बदलून पिंटू सिंग नावाने हैदराबाद येथे वावरत असल्याचे समजले. तसेच त्याची नांदेड येथे राहणारी मुलगी व जावयाच्या तो संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुलगी आणि जावयाचा मोबाईल पाच महिने ट्रॅप करत तेलंगणा येथील बगलागुंडा येथून मनोहरला बेड्या ठोकण्यात आल्या. कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तायडे, हवालदार संजय झोळ, पोलीस नाईक सचिन ठोंबरे, पोलीस नाईक प्रवीण पाटील, शिपाई प्रमोद कोकाटे यांनी या तपासात भाग घेतला.