
उल्हासनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या नामचीन दरोडेखोराची विठ्ठलवाडी पोलिसांनी मस्ती उतरवली आहे. भरवस्तीत त्याची धिंड काढून पोलिसांनी त्याच्या दहशतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुमित कदम उर्फ लाला असे या दरोडेखोराचे नाव असून त्याने तीन महिन्यांपूर्वी आशेळे गावात गाड्यांची तोडफोड व महिलेवर तलवारीने वार केले होते. या हल्ल्यानंतर तो फरार होता.
सुमित कदम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर तीन दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याने तीन महिन्यांपूर्वी परिसरात स्वतःची दहशत पसरवण्यासाठी तलवार नाचवत धिंगाणा घातला होता. त्यानंतर पोलीस पकडतील या भीतीने तो लपून बसला होता. याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व गुन्हे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला.
अखेर तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर हा दरोडेखोर बदलापुरात लपून बसल्याची माहिती उपनिरीक्षक बी. आर. दराडे यांना मिळाली. त्यानुसार हवालदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड, सागर मोरे यांनी सापळा रचून सुमितच्या मुसक्या आवळल्या.