
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये गेले अनेक वर्ष जे विद्यापीठात रोजदारीवर काम करत आहेत व जे प्रकल्पग्रस्त आहेत अशांना डावलून हितसंबंधीयांची भरती करण्यात येत आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला गेला नाही तर मात्र महाविकास आघाडीच्या वतीने कोकण कृषी विद्यापीठाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुधवारी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांची भेट घेतली. सध्या कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत अनियमितता दिसून येत असल्याचे महाविकास आघाडीने म्हटले आहे. या भरती प्रक्रियेत हितसंबंध जपण्याचे काम सुरू असून पात्र उमेदवारांना डावलले जात आहे. यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे, यात बदल व्हावा.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला आपल्या जमिनी देणारे अनेक शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेले अनेक वर्ष विद्यापीठात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला आहे. कुलगुरू म्हणून यात लक्ष घालून जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, पात्र प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा आणि ही भरती प्रक्रिया बिनचूक करावी. तसे झाले नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या अनियमित भरती प्रक्रियेविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.