
मी गाण्यांचा जन्म पाहिला. त्यामुळेच मला चाली करण्याचा छंद लागला. बालपणापासून बाबूजींच्या गायनाचे संस्कार झाले आणि त्यातून जे आले ते रसिकांसमोर सादर केले. बाबूजींचा प्रभाव माझ्यावर नव्हताच. माझ्या चाली स्वतंत्र होत्या. रसिकांच्या डोळ्यांतील आनंद माझ्यासाठी आशीर्वाद आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केले. लता मंगेशकर यांनी माझे गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली, तो मोठा पुरस्कार होता, असेही ते म्हणाले.
श्रीधर फडके यांच्या पंचाहत्तरीनिमित्त मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘झाले मोकळे आकाश…’ हा कार्यक्रम सादर झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, पंडित उपेंद्र भट, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, उत्तरा केळकर, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, लेखिका सुकन्या जोशी, चित्रा फडके, अरुणा हेटे उपस्थित होते.
श्रीधर फडके यांची गाणी म्हणजे खरं तर एक समाधान आहे. ‘पिंड ते ब्रह्मांड’ इतका विशाल व्याप त्यांच्या संगीतामध्ये आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संगीताला अतुलनीय देणगी दिली. महाराष्ट्राने मात्र त्यांना देण्यात कद्रूपणा दाखवला. त्यांनी आयुष्यभर संगीताला मनसोक्त दिलं, पण नियतीनं मात्र त्यांच्या वाट्याला कठोरता आणली, अशी खंत आशीष शेलार यांनी व्यक्त केली.
‘अमृताच्या जणू ओंजळी’चे प्रकाशन
यावेळी श्रीधर फडके यांचे पंचाहत्तर दिव्यांनी औक्षण करण्यात आले. तसेच त्यांच्या सांगीतिक प्रवासावरील सुकन्या जोशी यांनी लिहिलेल्या ‘अमृताच्या जणू ओंजळी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ते डिंपल प्रकाशनने प्रकाशित केले आहे. हा कार्यक्रम व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत असून, जीवनगाणी आणि स्वरगंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.