
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी कायद्याविरोधात महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी निषेध आंदोलन पुकारले होते. शिवसेनेच्यावतीने शिवाजी पार्कवर तीव्र निदर्शने करण्यात आली.
राज्याच्या विविध भागांत महाविकास आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. हा अन्यायकारक कायदा रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी व सामाजिक संघटनांनी भाग घेतला.
मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार महेश सावंत, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, शिवसेना आमदार बाळा नर, उपनेते सचिन अहीर, ज्योती ठाकरे, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, रमेश कोरगावकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक
नाशिक येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर बुधवारी पदाधिकारी, शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा जोरदार निषेध केला. लोकशाहीचा गळा घोटणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. जनतेचा आवाज दाबणारा हा कायदा असून त्याची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते यांनी केली.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पदाधिकाऱयांनी अभिवादन केले. त्यानंतर जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, प्रमोद शेरे, शेखर घोसाळे, विजय देसाई, प्रशांत साळुंखे, रशीदा गोदड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर, नीलेश भोसले, नौसीन काझी उपस्थित होते.
राज्यात बुलढाणा, जालना, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशीव, सोलापूर, लातूर, ठाणे, जळगाव, अकोला, वाशीम, नाशिक, धुळे, पुणे यासह राज्यभरातील सर्व जिल्हांच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, डावे पक्ष व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले.