
नेपाळमधील राजकीय अराजक आणि उसळलेल्या आगडोंबानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सुमारे दीडशे पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये ठाण्यातील 67 तर पुण्यातील 19 व बीडमधील 11 पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत. पण नेपाळमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनी नेपाळमध्ये जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, कोल्हापूर, बीड, अकोला, यवतमाळ येथून पर्यटनासाठी गेलेल्या 150 पर्यटकांची मोठी कोंडी झाली आहे. नेपाळमधील विविध भागांत हे पर्यटक अडकले असून ते सुखरूप आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक भालचंद्र चव्हाण यांनी दिली.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी जेथे राहत आहेत तेथेच सुरक्षित राहावे, अनावश्यकपणे बाहेर पडू नये, तसेच स्थानिक भारतीय दुतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे भालचंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालय दुतावासाच्या संपका&त आहे. दरम्यान, राज्यातील हे सर्व पर्यटक विविध टूर ट्रव्हल्सच्या माध्यमातून नेपाळमध्ये गेले होते. बीड जिल्ह्यामधील 11 पर्यटक खासगी बसने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत.
मुरबाडमधील 190 पर्यटक नेपाळमध्ये अडकले
नेपाळमध्ये उसळलेल्या आगडोंबात मुरबाडमधील 190 पर्यटक अडकले आहेत. तालुक्यातील पिंपळेश्वर मठाच्या हरिहरेश्वर सेवा मंडळाची सहल काठमांडू येथे गेली आहे. यात महिला, पुरुष, वयोवृद्ध असे 100 पर्यटक आहेत, तर धसई भाजीपाला संघटनेचे माऊली ग्रुपचे 30 सदस्य व इंदेगावातील सोमनाथ बोऱहाडे यांची हसोबा ट्रव्हलचे 70 सदस्य असे किमान 190 पर्यटक नेपाळमध्ये असून या सर्वांचे मोबाईल बंद असल्याची माहिती मिळाली आहे.