
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा पर्दाफाश करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना हालवली आदिवासी पाड्यात घडली. विष्णू वाघमारे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या जादुटोणा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याचाच राग मनात धरून राजेश शिंदे याने विष्णूला मारहाण केली. कर्जत पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याने हल्लेखोरांना बळ मिळाल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.
११ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे विष्णू वाघमारे याला दिसले. त्याने घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला स्मशानभूमीत जादुटोणा व अघोरी कृत्य सुरू असल्याचे कळले. राजेश शिंदे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तांत्रिक-मांत्रिक विद्यांचा वापर करत असल्याचे उघड झाले. यावर संतप्त आदिवासी समाजाने कर्जत पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल न केल्याने मोकाट फिरणाऱ्या राजेश शिंदे याने संधी साधत विष्णूला अडवले आणि जाब विचारत मारहाण केली. या मारहाणीत विष्णूला गंभीर दुखापत झाली आहे.