छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला आयईडी काढताना स्फोट, दोन जवान जखमी

प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेला आयईडी काढताना त्याचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले असून जखमीपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या बारसूर मार्गावर हा स्फोट झाला.

सीआरपीएफचे एक पथक गुरुवारी सकाळी या भागात नक्षलवाद्यांनी पेरलेले भुसुरुंग निकामी करत होते. यादरम्यान आयईडीचा स्फोट झाला आणि यात दोन जवान जखमी झाले. जखमी झालेले जवान सीआरपीएफच्या 195 बटालियनचे आहेत. या स्फोटात बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (बीडीडीएस) पथकाचा जवान गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमींवर दंतेवाडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने रायपूरला नेण्यात येईल, असे दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले.