
लखनौ विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो विमान रनवेवर धावत असताना अचानक थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या क्षणी इर्मजन्सी ब्रेक लावले. विमानाच्या इंजिनला टेक ऑफसाठी दबाव मिळत नसल्याने पायलटने विमान थांबवण्याचा निर्णय घेतला, असे समजतंय.
इंडिगोच्या 6-ई-2111 विमानात 151 प्रवासी होते. यामध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या खासदार पत्नी डिंपल यादव यांचा समावेश होता. विमान अचानक थांबल्याने प्रवासी घाबरले. तथापि, नंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने शनिवारी घडलेल्या या घटनेचा अहवाल मागितला आहे. दरम्यान, इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की तांत्रिक कारणांमुळे विमानाला टेकऑफ रद्द करावा लागला.