
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने 117 धावांची झुंजार खेळी केली आहे. मात्र, इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे टीम इंडियाला सर्वगडी बाद 292 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आता 293 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमान टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी सलामीला येत सामन्याला सुरुवात केली. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागी केली. स्मृती मानधनाने 91 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 117 धावा चोपून काढल्या आणि आपल्या वनडे कारकिर्दीमधील 12 वे शतक साजरे केले. प्रतिका रावल अवघ्या 25 धावांवर बाद झाल्यानंतर हर्लिन देवोले (10), हरमनप्रीत कौर (17) हे स्वस्तात माघारी परतले. दिप्ती शर्माने 40 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर टप्याटप्याने विकेट पडत गेल्या आणि 49.5 षटाकांमध्ये संपूर्ण संघ 292 धावांवर बाद झाला. इंग्लंकडून डार्सी ब्राउनने सर्वाधिक 3 विकेट आणि गार्डनरने 2 विकेट घेतल्या.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारल्यामुळे याही सामन्यात विजय संपादित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून 2-0 अशा फरकाने मालिका जिंकण्याची संधी आहे. तर टीम इंडिया मालिका 1-1 अशी बरोबरीत करण्यासाठी प्रयत्नशील असेल.