
राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दुरुस्तींवर होणाऱ्या अवाजवी खर्चांकडे लक्ष्य वेधलं आहे. तसेच अवाजवी खर्चाला ‘जनतेच्या पैशाची उतमात म्हणायची की वाढलेली महागाई?’, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे डबल बेड मॅट्रेस आणि सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख खर्चाच्या महाराष्ट्र शासन ईनिवदेच्या पत्राचा फोटो रोहित पवार यांनी ‘X’ हँडलवरून पोस्ट केला आहे. ज्यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख दिसत आहे. रोहित पवार यांनी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सवाल उपस्थित केला आहे. तसेच
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये लिहितात की,’आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed mattress, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?’
पुढे लिहिताना रोहित पवार म्हणतात की ‘मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना..!’