
ST मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने 17450 चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीसाठी किमान वेतन 30 हजार रुपये असणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने 3 वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.