
हिंदुस्थानी वायुदलातील मिग-21 फायटर जेट पुढील आठवडय़ात सेवेतून निवृत्त होणार आहे. शुक्रवारी, 26 सप्टेंबरला मिग-21 अखेरच्या उड्डाणानंतर सेवेतून अधिकृतरीत्या निवृत्ती घेईल. मिग-21 च्या जागी नव्या पिढीचे लढाऊ विमान हिंदुस्थानी वायुदलाच्या ताफ्यात येईल. मिग-21 च्या जागी तेजस लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क 1ए या जेट विमानाला समावेश करण्यात येणार आहे. वायुसेनेचा कणा असे संबोधले जाणाऱया मिग-21 ने सहा दशकांहून अधिक काळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1963 साली हिंदुस्थानी नौदलात हे जेट सहभागी झाले होते. हे मूळचे सोव्हिएतचे फायटर जेट आहे. या जेटने 1965, 1971 आणि 1999 च्या कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. जबरदस्त वेग आणि हलक्या डिझाईनमुळे हे जेट पॉवरफुल बनले आहे.
मिग-21 एक योद्धा
मिग-21 हे लढाऊ विमानाने देशाचा गौरव वाढवला आहे. 62 वर्षे अखंडपणे सेवा दिल्यानंतर अखेर हे विमान सेवेतून निवृत्त होत आहे. निवृत्तीआधी हिंदुस्थानी एअर फोर्सने या लढाऊ विमानाला आकाशात नेऊन त्याचा गौरव केला. हे विमान वायुदलासाठी एक योद्धा म्हणून काम करत होते, अशा शब्दांत वायुदलाने या विमानाचा गौरव केला. वायुदलाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात मिग-21 चा जबरदस्त इतिहास दाखवला आहे. हे फायटर जेट विमान आता प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आतापर्यंत निवृत्त झालेल्या अनेक मिग-21 जेटला प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे.
पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान
मिग-21 हे लढाऊ विमान पहिल्यांदा 1963 साली वायुदलाच्या ताफ्यात आले. या विमानाने सहा दशके गाजवली. या विमानाला हिंदुस्थानचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान म्हटले जाते. कारण, हे हिंदुस्थानचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान होते. 1971 च्या युद्धात मिग-21 ने ढाकामधील राजभवनवर हल्ला केला होता. यामुळे पाकिस्तानला आत्मसमर्पण करावे लागले होते. 1971 मध्ये एफ-104 ते 2019 मधील एफ-16 पर्यंत शत्रूंच्या अनेक पिढीचे विमान खाली पाडण्यात मिग-21 चा अतुलनीय वाटा आहे.