शबरीमला मंदिराची बदनामी थांबवा!मुख्यमंत्र्यांचे आवाहन

केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरासंबंधी जाणीवपूर्वक खोटा आणि खोडसाळ प्रचार केला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. मंदिराला मिळणाऱया पैशांतून केरळ सरकार एक रुपयाही घेत नाही, तरीही काही जणांकडून सरकार पैसे घेत असल्याचा खोटा प्रचार केला जातो, हा प्रचार थांबवला पाहिजे, असे आवाहन केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी आज केले. ते जागतिक अयप्पा संगमम या कार्यक्रमात बोलत होते.

केरळ सरकार मंदिराचा एक पैसाही घेत नाही, उलट मंदिराच्या विकासासाठी आणि कर्मचाऱयांच्या पगारासाठी मंदिराला आर्थिक मदत करते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता काही जणांकडून खोटा प्रचार चालवला जात आहे की, सरकार कोणत्या तरी अल्पसंख्याकांची बैठक मंदिरात बोलावण्याची योजना आखत आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रचार जाणीवपूर्वक केला जातो. जर असा खोटा प्रचार समाजात केला जात असेल तर पत्रकारांनी खरे काय आहे, हे दाखवणे आवश्यक आहे. परंतु, काही लोक मुद्दामहून खोटे पसरवतात. कोरोना काळात मंदिर व्यवस्थापन आर्थिक डबघाईला आले होते. त्यावेळी सरकारने मंदिराला 140 कोटींची आर्थिक मदत केली होती. याशिवाय, 129 कोटी रुपये मंदिराच्या कार्यासाठी दिले होते. 2011 पासून आतापर्यंत शबरीमला मास्टर प्लानअंतर्गत 148 कोटी रुपये विकास योजनेवर खर्च करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.