
अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱयांना नुकसानीपोटी आर्थिक मदत म्हणून 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली. नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱयांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे जाधव-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 लाख 48 हजार 533.21 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात 1 लाख 51 हजार 222.6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 128 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात 21.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून शेतकऱ्यांना 3 लाख 23 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे, तर सांगली जिल्ह्यात 4 हजार 74.27 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी 7 कोटी 45 लाख 38 हजार रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.