
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1-B व्हिसाचे शुल्क थेट 80 लाखांवर नेल्याने अमेरिकेतील कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यात हिंदुस्थानात सुट्ट्यांसाठी आलेल्या अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने तत्काळ अमेरिकेत परत या नाहीतर एक लाख डॉलर्स भरा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून शनिवारपासून मिळेल त्या किमतीत तिकीट घेऊन या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेची वाट धरली आहे.
तसेच जे कर्मचारी दिवाळीच्या दरम्यान हिंदुस्थानात येणार होते त्यांनी देखील त्यांचा आगामी दौरा रद्द केला आहे. यातील काहींची तर दिवाळीनंतर लग्न होती, मात्र ट्रम्पच्या दणक्यानंतर त्यांना लग्न देखील रद्द करून पुढे ढकलावे लागले आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर अमेरिकेतून हिंदुस्थानात सुट्ट्यांसाठी येणाऱ्या हिंदुस्थानींनी आपले फ्लाईट तिकीट रद्द केले आहेत. यातील अनेक जण दिवाळी निमित्त हिंदुस्थानात येणार होते तर काहींनी आपली लग्न देखील पुढे ढकलली होती.
सध्या हिंदुस्थानात असलेले H-1B व्हिसा धारक अमेरिकेत परत जाण्यासाठी धडपड करत असल्याने, शनिवार रात्री दिल्ली-न्यूयॉर्क या फ्लाइटचे एका मार्गाचे इकॉनॉमी तिकीट शनिवारी दुपारी 1.05 लाख रुपयांना विकले जात होते.
हिंदुस्थानकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांची गोची
‘एक्स’ युजर कौस्तव मजूमदार यांनी आपल्या हँडलवर लिहिलंय की, दुर्गा पूजेसाठी अनेकजण हिंदुस्थानात येत होते.सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून निघण्याच्या तयारीत असलेल्या एका विमानात दुर्गापुजेसाठी हिंदुस्थानात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे विमान निघण्य़ाच्या तयारीत असतानाच H-1B व्हिसाच्या नव्या नियमांची बातमी आली. हा नियम ऐकून घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी विमानातून उतरण्यासाठी विनवण्या केल्या, पण विमानाची उड्डाणाची पूर्ण तयारी झालेली असल्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली.