
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
एकेकाळी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सध्या कुटुंबकबिल्याच्या झगडय़ात अडकले आहेत. रावांची कन्या के. कविता व चिरंजीव के.टी. रामाराव यांच्यातील संघर्ष इतका विकोपाला गेला की, रावांनी वैतागून आपली कन्या कविता यांची पक्षातूनच हकालपट्टी केली. आता पक्षातून बाहेर पडलेल्या कविता काय करतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
संकटे आले की, ती एकापाठोपाठ येतात, असे म्हणतात. रावांच्या बाबतीत ते खरेच ठरले आहे. एक लोकप्रिय मुख्यमंत्री व चांगले सरकार चालवूनही तेलंगणाच्या जनतेने रावांना घरी बसवले. त्यात सत्तेतून बाहेर पडल्यानंतर रावांना मणक्याच्या आजाराने ग्रासले व काही महिने ते बेडरीडन राहिले. रावांची अशी असहाय्य अवस्था आणि सत्ता नसल्याने त्यांच्या पक्षातील अनेक संधीसाधू पुढाऱयांनी नवा घरोबा केला. हे सगळे हलाहल रावांनी मोठय़ा हिमतीने पचवले. मात्र आता स्वतःचाच मुलगा व मुलगी के. कविता यांच्यात निर्माण झालेला सत्तासंघर्ष मिटवता मिटवता त्यांच्या नाकीनऊ आले. ईडी व इतर तपास यंत्रणांच्या भीतीपोटी चंद्रशेखर रावांनी कायमच भाजपधार्जिणी अशी भूमिका घेतलेली आहे. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही आपला पक्ष तटस्थ ठेवून रावांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली. आता पक्षातून बाहेर पडलेल्या कविता काय करतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
आंध्र प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी जे घडले तेच आता तेलंगणात घडत आहे. संयुक्त आंध्रचे त्या वेळचे लोकप्रिय मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी हयात असेपर्यंत त्यांच्या कुटुंबातही सगळे सुशेगात सुरू होते. रेड्डींच्या अपघाती निधनानंतर जगनमोहन व शर्मिला या त्यांच्या वारसांमध्ये सत्तासंघर्ष उडाला. परिणामी शर्मिला या पक्षातून बाहेर पडल्या. काही काळासाठी त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला व सध्या त्या काँग्रेसमध्ये आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता तेलंगणाच्या राजकारणात शर्मिलांचे अनुकरण करतात की कसे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसची सत्ता व ताकद असणारे राज्य म्हणून तेलंगणाची सध्याची ओळख आहे. सत्तेतून बेदखल झाल्यानंतर रावांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला घरघर लागली आहे. तेलंगणामधील विरोधी पक्षाची ‘स्पेस’ भरून काढण्यासाठी भाजपने अनेक खटपटी केल्या. बंडी संजय व किशन रेड्डी या दोघा नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. रावांचे अनेक सहकारी पक्षात पायघडय़ा घालून घेतले. मात्र परिणाम शून्य! तेलंगणात भाजपला हातपाय अजूनही पसरता आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर रावांना केंद्रीय सत्तेत स्थान देऊन त्यांचा पक्षच भाजपमध्ये विलीन करण्याच्या भाजपच्या हालचाली आहेत. त्याला कविता यांनी कडाडून विरोध केला होता. मद्य प्रकरणात कारवाई झाल्यानंतरही आपल्याच जन्मदात्या पित्याने आपली बाजू घेतली नाही हेही शल्य कविता यांच्या मनात आहेच. त्यावरून त्यांची असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. रावांना भाजपशी व भाजपला रावांशी सलगी केल्याखेरीज तेलंगणात रेवंत रेड्डींना रोखता येणार नाही. या स्थितीत कविता काँग्रेसमध्ये गेल्या तर तेलंगणाचे राजकारण अधिकच रंगतदार ठरेल. त्या ‘काँग्रेसचा हात’ हाती घेतात की स्वतंत्र चूल मांडतात? ते लवकरच समजेल.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा बोजवारा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ज्या योजना आणल्या त्या कालांतराने अपयशी ठरल्या, अशी टीका नेहमीच केली जाते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या वाजत गाजत आणलेल्या योजनेचा उडालेला बोजवारा त्याची पुष्टीच करतो. गर्भपाताचे मोठे प्रमाण व स्त्राr-पुरुष जन्मदरात असणारी मोठी तफावत भरून काढण्यासाठी पंतप्रधानांनी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत हरयाणासारख्या जिथे स्त्राrभ्रूण हत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशा राज्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचा श्रीगणेशा केला. मात्र एका दशकानंतर स्त्राr-पुरुष जन्मदराचे प्रमाण तर सुधारलेले नाही, उलट या योजनेचाच ‘गर्भपात’ झाल्याचे विदारक चित्र आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ही योजना फसली आहे. आर्थिक व जन सांख्यिकीय निदेशालयाने जारी केलेल्या आकेडवारीनुसार दिल्लीमध्ये एक हजार मुलांमागे केवळ 920 मुली जन्माला येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घसरत आहे. कन्या भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झालेले नाही हे वास्तव आहे. योजनांचा केवळ गाजावाजा करायचा, पंतप्रधानांचे फोटो जागोजागी लावायचे आणि त्यानंतर योजना वाऱयावर सोडून द्यायच्या, असा प्रचारकी थाट मोदी सरकारचा आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारखी चांगली योजनादेखील गटांगळ्या खाते आहे.
होसबलेंचे ‘हेल्थ बुलेटिन’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नंबर दोनचे नेते व सहकार्यवाह दत्तात्रय होसबलेंच्या ‘हेल्थ बुलेटिन’वरून संघाच्या वर्तुळात कारस्थानाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. होसबले मध्यंतरी जोधपूरमध्ये असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सामान्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही शिस्तप्रिय संघटना मानली जाते. संघातील आतली खबर बाहेर अजिबात जात नाही. पण संघाच्या नंबर दोन असलेल्या नेत्याच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदच घेतली. वास्तविक हे संघाच्या रिवाजात बसणारे नाही. आंबेकर यांनी हे धाडस ‘कोणाच्या’ आदेशाने केले यावर खमंग चर्चा सुरू आहे. वास्तविक, होसबले यांना मोहन भागवतांचे वारसदार मानले जाते. तरीही इतक्या पॉवरफूल नेत्याबद्दल हेल्थ बुलेटिन जारी करण्याची आगळीक आंबेकर यांनी केली. त्यामागचे कारण आता पुढे येत आहे. मध्यंतरी मोहन भागवतांनी आपल्या रिटायरमेंटचे संकेत दिले व पुढे घूमजाव केले. आपण रिटायर झालो की, मोदींना पंतप्रधानपदावरून आपोआपच पायउतार व्हावे लागेल असा भागवतांचा होरा होता. मोदींनी संघाचा प्लॅन धुडकावून लावला असला तरी भागवत मात्र लवकरच पद सोडतील अशी माहिती आहे. अशा वेळी नेहमीच मॉर्डनायझेनचा पुरस्कार करणाऱया भागवतांच्या मनात संघाची धुरा ही अशा नेत्याच्या हाती देण्याची इच्छा आहे, जो किमान वीस-तीस वर्षे संघाला नेतृत्व देऊ शकेल. भागवतांच्या या परिभाषेत वयाची सत्तरी गाठलेले दत्तात्रय होसबले बसत नाहीत. त्यामुळे होसबले हे सत्तरीचे आहेत व तब्येतीने त्रासलेले आहेत हे जगापुढे आणले की, पुढे आपल्या योजनेनुसार नवा वारसदार नागपुरात बसवणे भागवतांना सोपे ठरणार आहे. त्यामुळे होसबलेंचे ‘हेल्थ बुलेटिन’ जगजाहीर झाल्याची चर्चा आहे. एरवी एखादा खडा पडला तरी त्याची चर्चा संघाच्या वर्तुळातून बाहेर येत नाही. मात्र हे हेल्थ बुलेटिन कुठल्या गॅपमधून बाहेर पडले व कशासाठी यावर आता मोठय़ा चर्चा आहेत.