
>> विनायक
सप्टेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातून आणि ऑक्टोबर संपता संपता देशातून पावसाने काढता पाय घ्यायला हवा. या सरत्या पावसाला पुनरागमनायचं म्हणजे पुढच्या वर्षी परत येण्यासाठी आता निरोप असं सांगितलं जातं. गणपती विसर्जन करतानाही बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असंच आपण म्हणतो. निसर्गक्रमाशी निगडित अशी आपली संस्कृती.
या वर्षीचा पाऊस 7 जूनऐवजी 26 मे रोजीच सुरू झाला. मग थोडय़ा थोडय़ा विश्रांतीनंतर तो अव्याहत बरसू लागला. राज्यातल्या साऱया नद्या फोफावल्या. शेते हिरवीगार झाली. काही ठिकाणी तर अतिवृष्टीने पिकांचं नुकसानही झालं. बदलत्या जागतिक हवामानाचे हे परिणाम आहेत याची चर्चा सुरू झाली. मुंबईसारख्या महानगरांना वर्षभर पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहू लागले. खेडोपाडय़ातल्या विहिरी, तळी तुडुंब झाली.
मुंबईत सातव्या मजल्यावरच्या खिडकीतून 15 सप्टेंबरला पावसाच्या जोरदार सरींचा दिसणारा अनुभव सुखद आहे. दक्षिण हिंदुस्थानातून येणारे नैऋत्य मान्सून वारे सुरुवातीला जो पाऊस आणतात, तो नीट न्याहाळला तर नैऋत्येकडून (दक्षिण-पश्चिम दिशेने) तिरपा पडताना दिसतो. पाऊस नेहमी हवेच्या झोतामुळे तसाच पडतो. तीन-साडेतीन महिने या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून आलेल्या काळय़ाशार मेघदूतांनी भरभरून आणलेली जलसंपदा चार महिन्यांत ओली कृपा होऊन बरसते. धरित्री ‘सुजलाम’ आणि त्यामुळे ‘सुफलाम’सुद्धा करणारा हा काळ.
चार महिन्यांनंतर मात्र ‘उघड पावसा ऊन पडू दे’ अशी विनवणी करावी लागते. एवढय़ा दिवसांत न झालेलं सूर्यदर्शन व्हावं अशी आस लागते. दसऱयापर्यंत आकाश निरभ्र झालं तर आकाशदिव्यांचा आनंद अधिक. तरी अजून पावसाचा मुक्काम हलण्याची चिन्हे नाहीत. आताचा पाऊस मात्र थोडा नैऋत्येचा आणि थोडा ईशान्येकडून येणारा असा दिसतोय. ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व (नॉर्थ-ईस्ट) तिकडच्या वाऱयांनी आणलेल्या पाऊसरेषा नैऋत्येच्या पावसाच्या उलट दिशेने तिरप्या येताना दिसतात. तसाच अनुभव आज आला.
पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात भूभाग कमी आणि समुद्री पाण्याचं प्रमाण बरंच विस्तृत आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश वगळता श्रीलंकेपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सारं पाणीच पाणी. परिणामी तिथे उन्हाळ्यात होणारी सागरी जलाची प्रचंड वाफ आकाशाला सतत भिडत असते. सप्टेंबर ते मार्च या सहा महिन्यांत सूर्य दक्षिण गोलार्धावर अधिक काळ प्रकाशतो. त्यामुळे तिथे तयार झाले निम्बस ढग जथ्याने वरवर झेपावतात. यात पाण्याच्या वाफेचा प्रचंड साठा असतो. काही मेघाकार तर अनेक किलोमीटर मेघजल थरच निर्माण करतात. त्यामुळे त्याची ‘ढगफुटी’ झाल्यास पाणी सहस्रधारांनी ‘तबाबाबा तोय कोसळे’ असं बदाबदा पडतं. अचानक महापूर येतात. 26 जुलै 2005 रोजी मुंबई परिसराने याचा विदारक अनुभव घेतला.
पावसाचे असे ‘पराक्रम’ काही वेळा ओला दुष्काळ निर्माण करतात. महापूर आणतात. या वेळी मात्र हिंदुस्थानी पावसाने हवामान तज्ञांनाही चकित करणारा खरोखरचा विक्रम केलाय. एरवी दक्षिण हिंदुस्थानातून वेगाने येऊन हिमालयाच्या विशाल, उत्तुंग भिंतीने अडवले जाणारे ढग परत फिरतात आणि सारा उत्तर हिंदुस्थान जलमय करतात. या वेळी हे काम तर पावसाने केलंच, पण त्याने थेट हिमालयाची भिंत ओलांडून तिबेटमध्येही जलवृष्टी केली. ही ऐतिहासिक घटना म्हणायला हवी. कारण नैऋत्य मोसमी वाऱयांनी आणलेला पाऊस हिमालयही ओलांडू शकतो अशी वार्ता यापूर्वी कधी आल्याचं आठवत नाही.
मग ही ‘पर्जन्यम् लंघयते गिरीम्’ किंवा पावसाने हिमगिरी ओलांडण्याची किमया कशी घडली? मग ही अघटित (ऍनॉमली) गोष्ट घडल्याचं कसं समजलं. ते कळलं अर्थातच ठिकठिकाणच्या हवामान तज्ञांना. पावसाच्या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांचं निरीक्षण आणि विश्लेषण करताना त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याकडचे पर्जन्यमेघ बहुधा प्रथमच तिबेटपर्यंत पोहोचले आहेत. यामागचे कारण काय असावं.
एक कयास अर्थातच बदलत्या जागतिक हवामानाचा. याशिवाय ‘वातावरणीय प्रवाह’ (ऍटमॉस्फिअरिक रिव्हर्स) वेगाने नैऋत्येकडच्या पावसाळी ढगांना हिमालयापार घेऊन गेले असावेत. आणखी एक कारण म्हणजे आपल्या सरत्या पावसाच्या काळात पार युरोपकडून येणाऱया ‘एक्स्ट्राटॉपिकल’ वादळांनी आणलेल्या थंड वाऱयांची आणि पावसाची टक्कर आपल्या नैऋत्य मान्सून वाऱयांशी होऊन काही जलमेघ हिमालयाच्या रांगांकडे ढकलले जाऊन थेट तिबेटमध्ये पोहोचले! हे पहिल्यांदाच घडल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक. या वेळच्या पावसाचा हा नवाच विस्मयकारी खेळ!