दादा पुन्हा अध्यक्ष होणार! बीसीसीआय नव्हे ‘कॅब’ची जबाबदारी स्वीकारणार

हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषणविणारा सौरभ गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. गांगुली आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) च्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी होणाऱया ‘कॅब’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

गांगुलीने 2015 मध्ये ‘कॅब’मध्ये सचिव म्हणून सुरुवात केली होती. नंतर जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर तो अध्यक्ष झाला होता. 2019 पर्यंत पद सांभाळत त्याने ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी झेप घेतली होती. मात्र यावेळी ‘कॅब’ अध्यक्षपदाची धुरा गांगुलीसाठी सोपी ठरणार नाही, कारण ‘कॅब’ सध्या आर्थिक गैरव्यवहार आणि विश्वासार्हतेच्या प्रश्नांशी झगडत आहे.

भावाची जागा घेणार दादा

गांगुलींच्या व्यतिरिक्त बबलू कोलये सचिव, मदन मोहन घोष संयुक्त सचिव, संजय दास कोषाध्यक्ष आणि अनु दत्ता उपाध्यक्ष म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे. आजवर ही जबाबदारी सौरभ गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष गांगुली सांभाळत होता, मात्र लोढा समितीच्या नियमांनुसार सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्याला पद सोडावे लागले आहे.

‘कॅब’ची प्रतिम मलिन

बंगालच्या संघाचे मैदानावरील अपयश, आर्थिक अनियमितता आणि निर्णयप्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ‘कॅब’ची प्रतिमा मलिन झाली आहे. वित्त समितीचे सदस्य सुब्रत साहा यांना हितसंबंधांच्या संघर्षात दोषी ठरवून दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला. ऑगस्टमध्ये संयुक्त सचिव देबब्रत दास यांनाही आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.