पुन्हा स्वप्नभंग, पुन्हा उपविजेते… सात्त्विक-चिरागला चीन मास्टर्सच्याअंतिम फेरीतही पराभवाचा धक्का

हिंदुस्थानची बॅडमिंटन सुपरस्टार दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंग झाले. चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या जोडीला अव्वल नंबरच्या कोरियन जोडी किम योन हो-सिओ सिओंग जाए यांनी सरळ गेममध्ये 21-19, 21-15 ने पराभूत केले. फक्त 45 मिनिटांत हिंदुस्थानी जोडीचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

सलग अंतिम फेरीत हार

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेते सात्त्विक-चिराग यंदा सलग दुसऱया आठवडय़ात अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेते ठरल्यानंतर चीनमध्येही त्यांना पराभवाची झळ सहन करावी लागली. विशेष म्हणजे संपूर्ण आठवडाभर त्यांनी एकही गेम गमावला नव्हता, पण निर्णायक क्षणी झालेल्या चुका महागात पडल्या.

आघाडी गमावली, संधी वाया गेली

पहिल्या गेममध्ये हिंदुस्थानी जोडीने 14-7 अशी भक्कम आघाडी घेतली होती. दमदार स्मॅश आणि चिरागच्या अचूक नेट शॉट्समुळे ब्रेकवेळी ते 11-7 ने पुढे होते, पण नंतरच्या चुकांमुळे कोरियन जोडीने पुनरागमन करून गेम हिसकावला. दुसऱया गेममध्येही सुरुवातीला 8-6 ने आघाडी घेतली होती, मात्र चिरागचे सलग दोन शॉट बाहेर गेल्याने सामन्याचा कल बदलला. अखेरीस सात्त्विकने निर्णायक शॉट बाहेर मारला आणि विजेतेपद कोरियन जोडीच्या झोळीत पडले.

कोरियन जोडीचा अनुभव भारी

किम-सिओ ही जोडी या वर्षात नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचले होते आणि त्यांनी सहा विजेतेपदेही पटकावली असून त्यात पॅरिस जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्ण व ऑल इंग्लंड तसेच इंडोनेशिया ओपन सुपर 1000 मधील जेतेपदांचाही समावेश आहे. जगातील सर्वोत्तम आक्रमण (सात्त्विक-चिराग) आणि सर्वोत्तम बचाव (किम-सिओ) यांच्यातील लढत म्हणून पाहिला गेलेला हा सामना कोरियन जोडीच्या संयम आणि तांत्रिक कौशल्यामुळे त्यांच्या बाजूने झुकला.