
बीसीसीआयला येत्या आठवडय़ात नवा अध्यक्ष अध्यक्ष लाभणार आहे. दिल्ली संघाचा माजी कर्णधार मिथुन मन्हासने बीसीसीआय मुख्यालयात अध्यक्षपदासाठी आपले नामांकन दाखल केल असून या आठवडय़ात त्याच्या निवडीची शक्यता असल्याचे संकेत बीसीसीआयकडूनच देण्यात आले आहेत.
45 वर्षीय मनहास हा हिंदुस्थानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. 1997-98 ते 2016-17 या काळात तो 157 प्रथम श्रेणी, 130 लिस्ट-ए आणि 91 टी-20 सामने खेळला आहे. त्याच्या नावावर तब्बल 9714 धावांची नोंद आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे.
गेला महिनाभर बीसीसीआय आपल्या नव्या अध्यक्षपदाचा शोध घेत होते. यात त्यांनी सचिन तेंडुलकरच्या नावाचाही विचार केल्याचे सूत्रांकडून कळले होते. मात्र अखेर मनहासचं नाव नुकत्याच दिल्लीतील अनौपचारिक बैठकीत निश्चित केल्याचे कळले आहे. गेल्या महिन्यात रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते.
इतरही पदांसाठी स्पर्धा
वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ अध्यक्ष नव्हे तर इतर अनेक महत्त्वाच्या पदांसाठीही निवड होणार आहे. सचिव देवजीत सैकिया, आयपीएल, गव्हार्ंनग कौन्सिलचे चेअरमन अरुण धुमल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे अध्यक्ष रघुराम भट्ट यांनीही आपली नामांकने दाखल केली आहेत. भट्ट हे नवे कोषाध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहेत.
राजीव शुक्लांचा दावा
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पुढील कार्यकाळासाठी नवीन कमिटी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट करत मिथुन मनहास या माजी क्रिकेटपटूला अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. अरुण धुमल हे आयसीसी गव्हार्ंनग कौन्सिलचे चेअरमन म्हणूनच कार्यरत राहतील, असेही त्यांनी सांगितले. पुढील रविवारी होणाऱया बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.