भिवंडी-कल्याण-शिळ रस्त्यावर ब्लॅकआऊट; अपघात, लुटमार, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका

अत्यंत वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या भिवंडी-कल्याण-शिळफाटा मार्गावर सध्या अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पलावा पुलापर्यंत गेल्या दोन दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर ब्लॅकआऊट झाल्याने या मार्गावर अपघात आणि लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. रस्ता अंधारात गायब झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा मार्गाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे टाऊनशिप या भागात आले आहेत. त्यामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा ठरला आहे. प्रशासनाकडून या रस्त्याची व्यवस्थित देखभाल आणि दुरुस्ती केली जात नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना नेहमीच मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या दोन महिन्यांपासून हा रस्ता अंधारात गायब झाला आहे. पलावा उड्डाणपुलापर्यंत रस्त्यावरील सर्वच पथदिवे बंद आहेत. परिणामी रात्री वाहन चालवताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे अपघातांचे आणि लुटमारीचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

ठेकेदारावर कारवाई करा
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता जर डिफेक्ट लायबिलीटी परेडमध्ये येत असले तर नादुरुस्त पथदिव्यांसंदर्भात काम केलेल्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केली आहे. हा मार्ग अंधारात गायब झाल्याने वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा ल ागत आहे. त्यामुळे सर्वच पथदिवे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावीत असेही भगत यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.