
शिक्षक भरती रखडल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. त्याचे भान न ठेवता अनेक मंत्र्यांनी गावखेडय़ातील शिक्षकांना स्वतःच्या दिमतीला जुंपले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20पेक्षा जास्त शिक्षक शिकवणी सोडून मंत्र्यांचे पीए म्हणून राबत असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षकांची मंत्री कार्यालयात उसनवारी नियुक्ती करू नये, असा ग्रामविकास विभागाचा नियम आहे. तो धाब्यावर बसवून रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या कार्यालयात महाड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन शिक्षकांना उसनवारी तत्त्वावर ‘पीए’ म्हणून रुजू करून घेतले आहे. गोगावले यांच्या कार्यालयातूनच ही माहिती मिळाली. रीतसर पत्रव्यवहार करून या शिक्षकांना पीए म्हणून रुजू करून घेतल्याचा दावा गोगावले यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. पीए, पीएस आणि ओएसडी यांच्या नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार होतो. तो रोखण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारी कर्मचाऱयांच्या उसनवारी नेमणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्बंध घातले आहेत. त्याचे उल्लंघन होत असल्याचे गोगावले यांच्या कार्यालयातील नियुक्त्यांवरून स्पष्ट झाले आहे.
नियम असा आहे…
मंत्री कार्यालयात सरकारी अधिकाऱयांची नियुक्ती दोन प्रकारे करता येते. त्यात प्रतिनियुक्ती आणि उसनवारी अशा दोन पद्धती आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱयाचा पगार त्या कार्यालयाचा कर्मचारी म्हणून काढला जातो. तर उसनवारी तत्त्वावरील अधिकाऱयांचा पगार मूळ विभाग देतो, मात्र तो सेवा मंत्री कार्यालयात देत असतो. मात्र शिक्षक मंत्र्यांची चाकरी करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.