
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची जाज्वल्य परंपरा आजही कायम आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा या वर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आणि शिस्तीत 2 ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या मेळाव्यात धडाडणार आहे. सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, शिवसैनिकांना कोणता संदेश देणार, महाराष्ट्र हितासाठी कोणती गर्जना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्रासह देशभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांमध्ये स्वाभिमान जागृत केला. हिंदूंमध्ये प्रखर राष्ट्रवादाचा वन्ही चेतवला. शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी विचारांनी समाजजागृती झाली. राजकीय दिशा बदलण्याचे सामर्थ्य शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आहे याचा वेळोवेळी प्रत्यय आला आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला जिल्हा संघटकांसह राज्यातील लाखो शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रेमी जनताही या मेळाव्याची साक्षीदार ठरणार आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
पारंपरिक शस्त्रपूजा, सोने वाटप आणि रावणदहनही होणार
महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा कायम राखत शिवतीर्थावर सोने वाटप, शस्त्रपूजा त्याचबरोबर रावणदहनही होणार असून विविध माध्यमांद्वारे हिंदुस्थानात घरोघरी शिवसेनेचे विचार पोहचणार आहेत. दसरा मेळाव्याला महानगरपालिकेने परवानगी दिली असल्याने शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे.
पहिला टिझर झळकला
दसरा मेळाव्याचा पहिला टिझर आज शिवसेनेने लॉन्च केला. परंपरा विचारांची… धगधगत्या मशालीची! महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची!! असे अभिवचन देत लवकरच होणाऱया दसरा मेळाव्याची चाहूल या टिझरमधून देण्यात आली आहे.
जय्यत तयारी
शिवसेनाप्रमुखांची परंपरा उद्धव ठाकरे यांच्या सामर्थ्यशाली नेतृत्वात शिवसेनेने कायम राखली आहे. दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्याकरिता भव्य व आकर्षक व्यासपीठ उभारण्यात येत आहे. मेळावा सायंकाळी पाच वाजता असला तरी, राज्य आणि देशभरातून असंख्य शिवसैनिक सकाळपासूनच तर काही शिवसैनिक आदल्या दिवसापासूनच दाखल होत असतात. त्यांच्या व्यवस्थेकरिता सुरक्षा व पालिका यंत्रणांसोबत समन्वय बैठका, आरोग्य शिबिरे इत्यादींची पूर्वतयारी पार पडली आहे.