
काबूलहून उड्डाण केलेल्या विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये बसून एक 13 वर्षांचा अफगाणी मुलगा थेट दिल्लीत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुतुहलापोटी हा मुलगा विमानाच्या लँडिंग कम्पार्टमेंटमध्ये बसला होता, अशी माहिती आहे.
केएएम एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी 11 वाजता 2 तासांच्या प्रवासानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावर पोहोचले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हे कळल्यानंतर हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी चौकशीचे सोपस्कार करून त्या मुलाला त्याच विमानातून अफगाणिस्तानात परत पाठवले.
अफगाणिस्तानातील कुंदुज शहरात राहणारा हा मुलाने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून काबूल विमानतळावर प्रवेश केला होता. गंमत म्हणून त्याने विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये प्रवेश केला. तो तिथून बाहेर पडण्याआधीच विमानाने उड्डाण केले. दिल्लीत विमान उतरल्यानंतर तो उतरला. त्याला पाहून एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला माहिती दिली. खबरदारी म्हणून सुरक्षा अधिकाऱ्यांनी लँडिंग गियर डब्यात तपासणी केली. तिथे त्यांना लाल रंगाचा लहान स्पीकर आढळला. तो मुलाने सोबत आणला होता. त्यानंतर संपूर्ण विमानाचीही तपासणी करण्यात आली.