
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात मातृत्वाचा अवमान करण्याची प्रवृत्ती भाजपने सुरू करून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नीचतम पातळीवर नेऊन ठेवले आहे. राजकारणाचा स्तर घसरला असून, त्यांनी पोसलेल्या वाचाळवीरांनी महाराष्ट्रातील वातावरण दूषित केले आहे. या वाचाळवीरांपेक्षा अशा प्रवृत्तींना बळ देणारे नेतृत्व नेस्तनाबूत करण्यासाठी सांगलीतून सुरुवात होत आहे,’ असा इशारा महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते-आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मिरज रोडवरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील पाटील, अमोल कोल्हे, विशाल पाटील, नीलेश लंके, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, डॉ. विश्वजित कदम, अरुण लाड, उत्तम जानकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार राजू आवळे, मिलिंद कांबळे, मानसिंगराव नाईक, सक्षणा सलगर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रणजित बागल, प्रा. यशवंत गोसावी, माजी आमदार विक्रम सावंत, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, महेबूब शेख, ऍड. धायगुडे, राजू जानकर, दिलीप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा राम मंदिर चौकातून पंचमुखी मारुती रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मेन रोड, कापड पेठमार्गे स्टेशन चौकात आला. या ठिकाणी जोरदार निषेध सभा झाली. या सभेला हजारोंच्या संख्येत लोकांची उपस्थिती होती. दुपारी अडीच वाजता सुरू झालेली ही निषेध सभा सायंकाळी पावणेसहा वाजता संपली. ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर अनेक नेत्यांनी भावना व्यक्त करताना सध्याचे कुचकामी, जातीयवादी सरकार आणि या सरकारचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा झोड उठवला. राष्ट्रवादीचे संजय बजाज यांनी कुशलतेने मोर्चा व विराट निषेध सभेचे आयोजन केले.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, एकदा पोलिसांकडून सूट द्या. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सडेतोड उत्तर देईल. भाजपने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली. अनेक नेते फोडले; पण जयंत पाटील ठाम राहिल्यानेच भाजपने त्यांच्यामागे षडयंत्र लावले. अशी भाषा पुन्हा निघाली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.