
मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर कारला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. दोन्ही वाहने अतिशय वेगात होती. अपघातात एक जण गंभीर भाजला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. कारमधील कुटुंब देवदर्शनाहून घरी परतत होते. यादरम्यान अलिगढपासून 20 किमी अंतरावर अकराबाद येथे कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत तेलाचा टँक फुटल्याने कारला आग लागली. डिझेलमुळे आग वेगाने पसरली. या आगीत कारमधील कुटुंब होरपळून मरण पावले. एक जण गंभीर भाजला आहे. त्याला अलिगढमधील रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. एक तासाच्या अथक प्रयत्नांनतर कारला लागलेली आग विझवण्यास यश आले.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.