Latur News – अतिवृष्टीच्या संकटामुळे चेरा येथे शेतकर्‍याने जीवन संपवले

अतिवृष्टी शेतकर्‍यांची पाठ सोडत नसल्याने जळकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे उभी पिकं नष्ट झाली. या नुकसानीमुळे मनोबल खचल्याने चेरा (ता. जळकोट) येथील उत्तमराव रामराव माने (49) या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वांजरवाडा येथे पाठवला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे

मयत शेतकरी उत्तमराव माने यांना चेरा येथे गट नंबर 328 व 329 मध्ये 69 आर एवढी जमीन आहे. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. माने यांनी उसनवारी करून आणि कर्ज काढून शेती केली. पण पेरलेली पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त केली. महिना-दीड महिना झाला तरी अतिवृष्टी थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतीचे उत्पन्न तर दूरच शेतालाही जाता येईना. त्यामुळे उद्विग्न झालेले शेतकरी उत्तमराव माने यांनी मंगळवारी सकाळी 4.45 वाजता त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
.